१. श्रीमती दमयंती वैती, मुलुंड
१ अ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चैतन्यमय वाणीने स्वतःला आध्यात्मिक लाभ झाले’, असे जाणवणे : ‘नवरात्रीला श्री नवदुर्गेची स्थापना झाल्यापासून मनाला आलेली मरगळ निघून गेली. त्यात ‘नवरात्रीत नऊ दिवस देवीचा जागर’ हा सत्संग श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ साक्षात् दुर्गेच्या रूपात घेत आहेत आणि त्यांच्या मुखातून जणूकाही अमृतच बाहेर पडत असून त्यातून आध्यात्मिक लाभ होत आहे’, असे मला जाणवले.
१ आ. भावसत्संग ऐकल्यानंतर प्रकृती सुधारणे : घटस्थापनेपूर्वी माझी प्रकृती ठीक नव्हती; पण हा सत्संग ऐकायला लागल्यापासून माझ्या प्रकृतीत एकदम सुधारणा झाली. ‘साक्षात् देवीने माझ्या देहावरील अनारोग्याचे आवरण काढून टाकले आणि मला तिच्या कुशीत घेतले’, असे मला वाटत आहे. ‘या आपत्काळात हा दैवी सत्संग ऐकायला मिळत आहे’, ही देवीची केवढी कृपा !
परात्पर गुरु डॉक्टर, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
२. श्रीमती राधा वेंकटरमण, मुलुंड
२ अ. सत्संगामुळे सकारात्मकता निर्माण होऊन उत्साह वाटणे : ‘नवरात्रीतील भावसत्संग पुष्कळ आनंददायी आणि हृदयस्पर्शी होत आहेत’, असे मला वाटले. सत्संग ऐकून माझा भाव वाढला. श्री राजेश्वरीदेवीचे अष्टकम् पुष्कळ मधुर आणि अप्रतिम होते. सत्संगाच्या त्या एका घंट्यात पुष्कळ सकारात्मकता निर्माण होऊन माझ्या मनात उत्साह निर्माण झाला.’
२ आ. सत्संग ऐकून देवीचे प्रत्यक्ष सुंदर दर्शन झाल्याची अनुभूती येऊन तिच्या या कृपाशीर्वादासाठी कृतज्ञता वाटणे : नवरात्रीचे सत्संग आणि सत्संगातील वातावरण फारच सुंदर असते. आम्हाला सरस्वतीदेवी आणि मुकांबिकादेवी यांच्याविषयी ठाऊक नसलेली माहिती मिळाली. ती ऐकून फारच छान वाटले. सत्संगातील गीते आनंददायी आणि दुःखे दूर करणारी होती. सध्याच्या या परिस्थितीत आम्ही मंदिरात जाऊ शकत नाही; पण देवीच्या कृपाशीर्वादाने आम्हाला सत्संगातच देवीचे सुंदर दर्शन झाले. देवीने भरभरून केलेल्या या कृपेसाठी तिच्या चरणी नमन आणि सर्व गुरुजनांना भावपूर्ण वंदन !’
३. सौ. अमला पवार, कांदिवली, मुंबई.
३ अ. सत्संगातील जोगवा ऐकतांना भावजागृती होऊन भान हरपणे, सत्संग संपल्याचीही जाणीव न होणे : ‘भावसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ देवीचे वर्णन करत होत्या, तेव्हा मला ‘त्या आदिमाया आहेत’, असे मला वाटले. ‘जोगवा’ चालू झाल्यावर माझे शरीर आपोआप थरथरून डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. ‘सत्संग संपला आहे’, याचेही मला भान नव्हते. मला ‘देवी दुष्टांचा संहार करत आहे’, असेच दृश्य समोर दिसत होते. नवरात्रीतील या सत्संगांसारखे सत्संग मी यापूर्वी कधीच अनुभवले नव्हते. भगवंता, तुझी लीला अगाध आहे !’
४. सौ. उषा बच्छाव, डहाणू
४ अ. नवरात्रीचे भावसत्संग ऐकून पुष्कळ भावजागृती होऊन सत्संग ऐकण्याची आतुरता वाढणे : ‘नवरात्रीचे भावसत्संग ऐकण्यासाठी मला घरातील सर्व कामे अडीच वाजेपर्यंत आवरून भावसत्संग ऐकण्याची तळमळ लागली होती. मला आतापर्यंत कधीही न मिळालेली माहिती भावसत्संगातून मिळत होती. सत्संग ऐकतांना माझी पुष्कळ भावजागृती होत होती. दिवसेंदिवस माझी सत्संग ऐकण्याची आतुरता आणि तळमळ वाढत होती. ‘नऊ दिवस केव्हा संपले ?’, ते मला कळलेही नाही.’
५. सौ. प्रणाली बारस्कर, नेरूळ
‘मला भावसत्संगातून पुष्कळ शक्ती आणि चैतन्य मिळाले. त्यात सांगितलेला नामजप केल्यावर मला आनंद आणि शांती यांची अनुभूती आली. भावसत्संगामुळे माझ्या घरातील सदस्यांची चिडचिड न्यून झाली आहे. या वेळी मला पूर्ण नवरात्र आध्यात्मिक स्तरावर अनुभवता आले. कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती न्यूनच आहे.’
६. सौ. सरला हिरेकर, नेरूळ
६ अ. भावसत्संगात जोगवा ऐकतांना भावजागृती होणे : ‘आज भावसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ ‘जोगवा’ हा शब्द उच्चारत असतांना संपूर्ण अंगावर रोमांच येत होते. डोळ्यांतून भावाश्रू वहात होते. ‘जोगवा’ या शब्दाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. ‘जोगवा, जोगवा’, असेच म्हणत रहावे’, असे वाटत होते.
६ आ. ‘भावसत्संगात ‘गोंधळ’ ऐकतांना कलियुगातील युद्ध चालू आहे’, असे दिसत होते.’
७. सौ. संगीता परमार, मिरारोड
अ. ‘भावसत्संग ऐकतांना मनाला फार शांत वाटले. मला घरात प्रकाश जाणवला. ‘मी शिवलोकात कैलासावर आहे’, असे जाणवून देवी आईचे अस्तित्व अनुभवता आले.
आ. ‘मी मातेच्या कुशीत बसली आहे आणि तिचे वात्सल्यप्रेम अनुभवत आहे’, असे मला वाटले. ‘भावसत्संग घेणार्या ताई किती ज्ञानी आणि अहंशून्य आहेत’, असे मला जाणवले.’
८. सौ. कविता राणे, गिरगाव, मुंबई.
८ अ. भावसत्संग ऐकतांना भावजागृती होऊन कृतज्ञता व्यक्त होणे : ‘आपल्याला अन्न, भाजी, पाणी हे सर्व अन्नपूर्णादेवी, शाकंभरीदेवी आणि शताकशीदेवी यांच्या कृपेने मिळते. माझ्याकडून त्यांच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त झाली. अष्टदेवींविषयी माहिती ऐकतांना माझी भावजागृती होत होती.’
९. श्री. विवेक भोईर, दादर, मुंबई.
९ अ. सत्संग ऐकतांना देवीच्या अस्तित्वाची प्रचीती येणे : ‘नवरात्रीचे सर्व भावसत्संग फार सुंदर होते. ‘साक्षात् देवी समोर प्रकट झाली आहे. सगळीकडे सुगंध दरवळला आहे आणि तेजस्वी प्रकाश पसरला आहे’, असे मला जाणवले. मला प्रत्येक क्षणाक्षणाला देवीची प्रचीती येत होती. माझ्या मनाला फार बरे आणि प्रसन्न वाटले.’
१०. श्री. विवेक काळे, नेरूळ
‘दुपारी डोळे मिटून सत्संग ऐकत असतांना अकस्मात् माझ्या डोळ्यांतून पाणी यायला लागले. ‘कुणीतरी माझ्या डोक्यावरून हात फिरवत आहे’, असे मला जाणवले. त्याच क्षणी सत्संग संपला होता. मी सत्संगात तल्लीन होऊन सत्संगाशी एकरूप झालो होतो.’
११. सौ. पुष्पा पाटील, अंबरनाथ
‘मी नवरात्रीच्या नऊ दिवसांतील ३ – ४ दिवस भावसत्संग ऐकला. भावसत्संगात जे स्तोत्र लावले जायचे, ते स्तोत्र ऐकून अंगावर रोमांच येऊन भावजागृती होत होती. हा सत्संग ऐकतांना ‘मी मंदिरात बसले आहे’, असे मला वाटत होते.’
(ऑक्टोबर २०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |