‘विजय म्हटला, तर तो सैन्याचा रणांगणावरील विजय’ असेच चित्र डोळ्यांसमोर येते. प्रत्यक्ष युद्ध होण्यापूर्वी अथवा युद्धाच्या व्यतिरिक्त देशांमध्ये एकमेकांविरुद्ध आखलेले डावपेच, कूटनीती यांमध्येही विजय-पराजयाच्या घटना घडत असतात. त्यांचे वित्त अथवा जीवित हानी यांच्यासारखे दृश्य स्वरूप नसले, तरी ते एका मोठ्या युद्धाचे अंग असतात. त्याचे परिणाम देशाचा विकास, व्यापार-उदीम आणि आर्थिक यांवर मुख्यत्वे दिसून येतात. भारत कूटनीतीच्या युद्धात आक्रमक पावले उचलून आणि त्यात यशस्वी होऊन अशा स्वरूपाचे युद्ध जिंकत आहे.
१. कॅनडावर जरब निर्माण करणे !
जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर खलिस्तानी आतंकवादी निज्जर याच्या हत्येचा आरोप करत भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकार्याला देश सोडण्यास सांगितले. भारतानेही तात्काळ कॅनडाच्या अधिकार्याला देश सोडण्यास सांगितले, तसेच कॅनडातील नागरिकांसाठी भारताचे पारपत्र देणे बंद केले. याही पुढे जाऊन कॅनडाच्या भारतातील दूतावासातील ४१ अधिकार्यांना देश सोडण्यास सांगितले. त्यामुळे एकाएकी कॅनडाने भारताशी बंद दाराआड चर्चा करण्याचा पवित्रा घेतला आहे. एका विकसित देशाला विकसनशील देशाने आव्हान देत त्याची कोंडी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताची शक्ती वाढत असल्याचे हे निर्देशक आहे.
२. चीनच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न
डोकलाम येथे चीनच्या सैनिकांनी भारताच्या सीमेत दादागिरी करत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यावर भारतीय सैनिकांतील ‘घातक’ या पथकाने शस्त्रांविना चीनच्या सैनिकांशी लढा देत अधिकृत आकडेवारीनुसार ५०, तर अन्य आकडेवारीनुसार त्याहून अधिक सैनिकांना ठार केले होते. या लढ्यात भारताच्या २० सैनिकांना वीरमरण आले. भारतीय सैनिकांच्या या पराक्रमाची नोंद विदेशी माध्यमांनीही घेतली आहे.
३. तैवानमध्ये कृतीशील सहभाग
तैवान हा प्रदेश चीन स्वत:चा भाग समजतो. भारतही ते मान्य करतो; मात्र चीनच्या अरुणाचल प्रदेशावर दावा सांगण्याच्या कारवायांमुळे भारताने माजी सैन्यदलप्रमुखांना तैवान येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यास सांगितले आणि ते सहभागी झालेसुद्धा ! यामुळे चीनचा तीळपापड झाला असला, तरी भारताने त्याकडे लक्ष दिले नाही. आशियायी खेळांमध्ये अरुणाचल प्रदेश येथील खेळाडूंना चीनने वेगळा व्हिसा दिल्यावर भारताने त्यांच्या खेळाडूंना तेथील खेळांवर बहिष्कार घालण्यास सांगितला.
४. चीनला आव्हान उभे करणे
चीनच्या ‘वन बेल्ट वन रोड’ (चीनद्वारा प्रायोजित या योजनेच्या अंतर्गत आशिया, आफ्रिका आणि युरोप यांना रेल्वे अन् रस्ते यांनी जोडण्यात येणार) या योजनेला प्रतिआव्हान म्हणून भारताने भारत, मध्य-पूर्व ते युरोप अशी कॉरिडॉरची घोषणा केली. त्याला आंतरराष्ट्रीय संमती मिळवून दिली आहे. रेल्वे आणि जलवाहतूक यांद्वारे हा मार्ग पूर्ण करण्यात येणार आहे. चीनचे आशियात भारतासाठी मोठे आव्हान आहे. चीनचे शेजारील देश चीनच्या कारवायांनी पीडित आहेत. त्यांना भारत त्यांच्यासाठी एक मोठा आधार वाटू शकतो, हे लक्षात घेऊन ‘जी २०’ परिषदेच्या आयोजनाच्या धामधुमीत पंतप्रधान मोदी ‘असियाना’ या ११ देशांच्या बैठकीसाठी इंडोनेशिया येथे जाऊन आले. या देशांमध्ये व्हिएतनाम, फिलिपाईन्स असे देश आहेत, ज्यांच्याशी चीनने सीमावाद निर्माण केला आहे. त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण करण्यासाठी भारत प्रयत्नशील असून चीनला याद्वारे घेरून नियंत्रणात ठेवण्याची भारताची युद्धनीती स्पष्ट होते.
५. भारताच्या शत्रूंना धडा शिकवला जाणे
पाकमधून आलेल्या आतंकवाद्यांनी भारताच्या ऊरी आणि पठाणकोट येथील सैन्य तळांवर आक्रमण केल्यावर भारताने पाकची सीमापार करून आतंकवाद्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला. भारताला अनेक वर्षे हवे असलेले आतंकवादी एकतर पाकमध्ये किंवा अन्य देशांमध्ये आहेत. या आतंकवाद्यांना भारताकडे सोपवण्यासाठी भारताने पाक आणि अन्य देश ज्यामध्ये कॅनडाचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल, त्या सर्वांचा अनेक वर्षे पाठपुरावा केला आहे. या देशांनी भारताच्या विनंतीला एवढी वर्षे झिडकारले आहे. आता मात्र विपरित घडत आहे. भारताला जे आतंकवादी हवे आहेत, त्यांच्या पाकमध्ये अथवा कॅनडामध्ये अज्ञातांकडून एका मागोमाग एक हत्या होत आहेत. या आतंकवाद्यांचे जवळचे नातेवाईकही मारले जात असल्यामुळे एक प्रकारची दहशत त्यांच्यात निर्माण झाली आहे. भारतातील अनेक आतंकवादी आक्रमणांचा मुख्य सूत्रधार हाफीज सईदच्या मुलाचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या व्यतिरिक्त पठाणकोट येथील आक्रमणाच्या सूत्रधाराची हत्या असो, कॅनडातील निज्जरची हत्या असो.
पाक भिकारी देश झाला असला, तरी भारताविरुद्ध आतंकवादाची त्याची भूक काही केल्या संपत नाही; मात्र त्याच वेळी स्वतंत्र बलुचिस्तानसाठी तेथील बलुची चळवळ गतीमान होत आहे. पाकव्याप्त काश्मीर येथील मुसलमान भारतात सहभागी होण्यासाठी आंदोलने करत आहेत, मोर्चे काढत आहेत. हे एकाएकी वाढले आहे.
६. नक्षलवादाचा खात्मा
नक्षलवाद मोडण्याची कामगिरी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चालू असून अनेक कुख्यात नक्षलवादी मारले गेले असल्यामुळे इतर अनेकांनी शस्त्रे खाली ठेवली आहेत. छत्तीसगड येथील काही भागांत, दंडकारण्यात त्याचा प्रभाव अधिक असला, तरी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ‘तो प्रभाव देशपातळीवर २५ टक्के एवढाच उरला आहे’, असे सांगितले. नक्षलवादाचा बीमोड करण्यात महाराष्ट्रातील ‘सी-६०’ या कमांडो पथकाने चांगली प्रगती दाखवली आहे. ही काही ठळकपणे दिसणारी भारताच्या कूटनैतीक, राजनैतिक आणि धोरणात्मक विजयाची उदाहरणे आहेत. प्रत्यक्ष युद्धांप्रमाणे त्यांनाही महत्त्व आहे. त्यातून प्रत्यक्ष युद्ध झाल्यास ते जिंकणेही भारताला सोपे होऊ शकते, हे लक्षात येते.
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२०.१०.२०२३)