चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी होणारी रामनवमी केवळ धार्मिक दृष्टीकोनातूनच महत्त्वाची नाही, तर सांस्कृतिक दृष्टीकोनातूनही महत्त्वाची आहे. प्रभु श्रीराम आपल्याला नेहमीच सत्य, न्याय आणि धर्म यांच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात. मर्यादापुरुषोत्तम प्रभु रामचंद्र हे आपल्या भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. प्रत्येकाच्या हृदयात ते विराजमान आहेत. त्यांचे जीवन म्हणजे संपूर्ण राष्ट्राला त्यांनी जगण्याचा मार्ग दाखवलेला आहे. संसारात राहून सामाजिक, नैतिक, कौटुंबिक आणि राजकीय मर्यादा पाळून पुरुष सदाचरणी राहू शकतो, याचे उत्तम उदाहरण, म्हणजे प्रभु श्रीरामचंद्र !

१. रामनवमी दिवशी असणारे उत्साहमय वातावरण
हिंदु पंचांगानुसार चैत्र मासात चैत्र शुद्ध नवमीस प्रभु रामाचा जन्म झाला. त्या दिवशी देशभरात सर्वत्र रामनवमीचा सोहळा उत्साहात साजरा केला जातो. अयोध्येपासून रामेश्वरपर्यंत हा सोहळा साजरा होतो. हिंदु संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. माध्यान्ह काळी सूर्य डोक्यावर येतो, तेव्हा ठीक दुपारी १२ वाजता रामजन्माचा सोहळा साजरा करतात. त्याआधी रामजन्मावर आधारित कीर्तन, प्रवचन होते. ते दुपारी १२ वाजता संपताच गुलाल उधळून जयजयकार केला जातो. पाळणा हलवला जातो. काही ठिकाणी जन्माचा ‘पाळणागीत’ही म्हणतात. रामाची आरती करून प्रसाद म्हणून बत्तासा, सुंठवडा वाटला जातो. रामनवमीच्या उत्सवाचा प्रारंभ काही मंदिरात गुढीपाडव्यापासून, तर काही मंदिरात रामनवमीपासून पुढे ८ दिवस कार्यक्रम होतात. या काळात नैमित्तिक भजन, कीर्तन, प्रवचन यांचे कार्यक्रम असतात. काही विशेष कीर्तनकार, प्रवचनकार यांच्या कार्यक्रमांचेही खास आयोजन केले जाते. ‘गीतरामायणकार’ ग.दि.माडगूळकर आणि सुधीर फडके यांनी गायलेल्या ‘गीतरामायणा’ची गाणी अनेक ठिकाणी लावली जातात.

२. रामनाम घेणे आणि रामरक्षा म्हणण्यामागील महत्त्व
श्रीराम हा भगवान श्रीविष्णूचा ७ वा अवतार समजला जातो. देवता आणि अवतार यांच्या जन्मदिवशी त्यांचे तत्त्व भूतलावर सहस्रो पटींनी कार्यरत असते. श्रीरामही अवतारी देवता असल्यामुळे रामनवमीला त्यांचे श्रीरामतत्त्व सहस्रो पटींनी कार्यरत असते. म्हणून या दिवशी ‘रामरक्षा’ स्तोत्राचे पाठ, ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप केल्याने अधिक पटींनी लाभ मिळत असतो. म्हणून अनेक मंदिरात ‘रामनामा’ची धून लावून अखंड जप केला जात असल्याचे दिसते. गुढीपाडवा ते रामनवमी या काळात प्रतिदिन १३ वेळा ‘रामरक्षा’ स्तोत्र श्रद्धापूर्वक म्हटल्यावर ते सिद्ध होते. रामरक्षेत शरिराच्या प्रत्येक अवयवांसाठी स्वतंत्र श्लोक आहेत. त्यामुळे त्या त्या अवयवांचे विकार बरे होतात. यासह पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे राक्षस ‘राम’ नावाने रक्षलेल्या लोकांकडे नजर वर करून पाहू शकत नाहीत. म्हणूनच रामरक्षा, हनुमान चालीसा पठण, रामनामाचा जप, ‘रामचरितमानस’चे पठण केल्याने संकट निवारण होते, दुःखापासून मुक्ती मिळते आणि मनोकामना पूर्ण होऊन सुख-समृद्धी लाभते.
३. रामनाम घेऊन त्यांच्यातील गुण अंगी बाणवूया !
नैतिक, राजकीय, सामाजिक, कौटुंबिक मर्यादेचे उल्लंघन होऊ न देता पुरुषोत्तम कसा असतो, याचे उदाहरण म्हणजे प्रभु श्रीराम आहे. रामाचे संपूर्ण जीवनच मार्गदर्शक स्रोत आहे. श्रीराम हे कौटुंबिक आदर्श आहेत आणि मातृ-पितृ भक्ती अनुकरणीय आहे, तसेच एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, सत्य वचनी होते. चांगल्या राज्याची संकल्पना म्हणून ‘रामराज्य’ शब्द प्रचलित आहे. ‘ज्या राज्यातील प्रजा अत्यंत सुखी आणि समाधानी असते’, अशा राज्याला ‘रामराज्य’ म्हणतात.
भगवान प्रभु रामचंद्र हे केवळ एक धार्मिक व्यक्तीमत्त्वच नाही, तर ते योग्य जीवन जगण्याचे प्रतीक आहेत. त्यांचे जीवन सत्य, नीतीमत्ता, कर्तव्य, त्याग आणि प्रेम यांसारख्या सद्गुणांनी भरलेले होते. आपल्या जीवनात हे गुण आत्मसात् करून आपण एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करूया. आपल्या प्रत्येकाला आपले जीवन श्रीरामाच्या चरणी समर्पित व्हावे, असेच वाटत असते. आपण ‘आदर्शांचा आदर्श राम’ म्हणत असतांना त्याचा काही तरी अंश, गुण आपल्यात उतरायला हवा, तरच रामनामाचे जपाचे सार्थक होईल. शेवटी….‘रामनाम उच्चारा आणि जन्माचे सार्थक करा’, तसेच ‘श्रीराम जय राम जय जय राम’, हा तारक मंत्र जपा.
– श्री. दिलीप देशपांडे, जळगाव. (३.४.२०२५)