गुढीपाडव्याला हिंदूंचा नववर्षदिन आपण नुकताच साजरा केला. प्रभु श्रीरामचंद्र वनवासाहून परत आले, तो हाच शुभदिवस होता. अयोध्येसाठी प्रभूंचा स्वागतदिन होता. १४ वर्षे वनवास भोगून पितृवचनातून मुक्त झालेला हा दैवी अवतार. चैत्रातील नवमीला श्रीरामांचा जन्म झाला होता. दशग्रंथी, तपस्वी, कलागुण संपन्न तरीही अहंकारी दशानन रावणाचा वध करण्यासाठी हा अवतार वनवासात गेला. राक्षसी वृत्तीचा संहार करणारा हा पुरुषोत्तम भगवान ! भगवान श्रीविष्णूच्या मुख्य दशावतारांपैकी एक. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, राम, परशुराम, कृष्ण अशा रूपांत भगवंताने ‘सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या नाशासाठी’ या भरतभूमीवर अवतार घेतला. भक्तांच्या भक्तीला हाक देऊन त्यांना अत्यंत दुर्लभ असा मोक्ष प्राप्त करून दिला. भगवान विष्णूंचा रामावतार, पुरुषोत्तम अवतार, म्हणजे ‘माणसाने कसे वागायला हवे ?’, याचा जणू वस्तूपाठच होता. प्रभु रामचंद्रांचा संयम, क्षमाशील वृत्ती, आज्ञापालन, प्रजाहितदक्ष राजा असे अनेक सद्गुण त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांतून अधोरेखित होतात. ते आदर्शांचा आदर्श होते !
राज्याभिषेक होण्यापूर्वी कैकयी मातेने राजा दशरथाला तिला दिलेल्या वचनाची आठवण करून देऊन ‘श्रीरामांना वनवास आणि भरताला राज्याभिषेक’, असे वर मागून घेतले. पित्याने मातेला दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी प्रभु श्रीरामांनी १४ वर्षे वनवास स्वीकारला. यात आज्ञापालन, माता-पिता यांच्याविषयी आदरभाव, तसेच परेच्छा, परिस्थिती स्वीकारणे हे गुण दिसतात. प्रत्यक्ष राजपुत्राला वनवासाची आज्ञा झाल्यानंतर तसूभरही विचलित न होता भगवंतांनी राजवस्त्रे त्यागून वल्कले धारण केली. या संदर्भात पुढे अनेक वर्षांनंतर भरताने प्रभूंना विचारले, ‘माता कैकयींना आपण शिक्षा का केली नाही ? त्यांना दंड का दिला नाही ? सामान्य नागरिकांना अपराधाचे शासन आणि राजमातेला मात्र शासन नाही, असे का ?’ प्रभु म्हणाले, ‘ज्या आईने तुझ्यासारख्या पुण्यात्म्याला जन्म दिला, तिला शासन कसे बरे करायचे ?’ भरताने विचारले, ‘हा तर स्वार्थ किंवा पाठीशी घालणे झाले. एक राजा म्हणून अपराध्याला शासन दिलेच पाहिजे, तर माता कैकयीला शासन का नाही ?’ प्रभु श्रीराम अत्यंत शांतपणे सांगतात, ‘तिच्याच या निर्णयामुळे आपल्या सार्यांचे बंधूप्रेम जगाला समजले. मला वनवास होता; पण लक्ष्मण आणि भरत, शत्रुघ्न तुम्ही सार्यांनी राज्यत्याग केला, वनवास भोगला.’ परिस्थितीकडे पहाण्याचा केवढा हा सकारात्मक दृष्टीकोन ! या रामनवमीच्या निमित्ताने आपणही स्वदोष त्यागून सद्गुणांची वृद्धी करण्याचा प्रयत्न करूया !
– सौ. अपर्णा गंगाधर जोशी, पुणे.