उद्या (६.४.२०२५) असलेल्या रामनवमीच्या निमित्ताने…
१. कमलपुष्पाचे माहात्म्य !
श्रीसमर्थ दशरथनंदन श्रीरामाच्या सगुण रूपाचे मोठ्या रसिकतेने, भावभक्तीने वर्णन करत आहेत. भारतीय संस्कृतीच्या विभिन्न प्रतीकांमध्ये सर्वांत श्रेष्ठ आणि पवित्र स्थान कमलपुष्पाचे आहे. कमळ चिखलात उगवते, वाढते आणि फुलते. आजूबाजूला चिखल पसरलेला असला, तरी त्याविषयी कुरकुर न करता/रडत न बसता स्वतःचा विकास स्वतः साधते. कमळाची कायम उर्ध्व दृष्टी असते. सूर्याकडे लक्ष केंद्रित करून कमळ स्वतःचे जीवनध्येय गाठते. कमळ माणसाला शिकवते की, योगायोगाने परिस्थितीवश प्रतिकूल परिस्थितीत जन्म झाला, तरी उच्च ध्येयावर दृष्टी ठेवून स्वतःचे कल्याण करून घेणे स्वतःच्याच हातात असते. कमलपुष्प शतदल किंवा सहस्रदलसुद्धा असते. विभिन्न संप्रदाय, जाती, पंथ, भाषा यांनी सुशोभित अशी आपली भारतीय संस्कृती अनेकातून एकता साधणारे एकप्रकारे कमळच आहे.

२. श्रीरामाचे अवयव कमलासमान असणे
श्रीरामचंद्र लावण्यखाणी आहेतच; म्हणून श्रीरामाच्या अनन्य भक्तांनी रूपसंपन्न रामाच्या प्रत्येक अवयवाला सनातन धर्माने श्रेष्ठ आणि पवित्र समजलेल्या कमळाची उपमा दिली आहे. नेत्र/नयनकमल, हृदयकमल, वदनकमल, हस्तकमल, चरणकमल, कमळ म्हणजे अलिप्तपणा, अनासक्तीचा आदर्श, मांगल्याचा महिमा, प्रकाशाचे पूजन, सौंदर्याची निर्मिती आहे. सर्व देवांना कमळाचे आकर्षण आहे. ब्रह्मदेव कमलासनात आहे. विष्णु कमलहस्त, लक्ष्मी कमलजा, सूर्य तर स्वतः नभाच्या नील सरोवरातील रक्त कमळच आहे. असे हे कमलाचे माहात्म्य होय.
३. अनुष्ठानात एक कमलपुष्प न्यून पडल्यावर श्रीरामाने केलेला प्रयत्न आणि देवीने दिलेला आशीर्वाद !
कौसल्यामाता श्रीरामांच्या लोचनाला ‘राजीवलोचन’ म्हणते. त्याची एक कथा देवी भागवतात सांगितली आहे. श्रीराम देवीची, म्हणजेच आदिशक्तीची उपासना करतात. १०८ कमलपुष्पे महामायेला अर्पण करायची असतात. सर्व सिद्धता करून श्रीराम अनुष्ठानाला बसतात. भावभक्तीने मंत्रोच्चार करत एकेक पुष्प श्रीचरणी अर्पण करतात.
देवीमाता परीक्षा घेते. अनुष्ठानात एक कमलपुष्प न्यून पडल्यावर श्रीरामाला वाटते, ‘आता काय करावे ? पूजा करतांना जागेवरून तर उठता येत नाही. कौसल्यामाता लहानपणी मला ‘राजीवलोचन’ म्हणत असे, म्हणजे मी माझे चक्षू देवीमातेला वाहू शकतो.’ ते लगेचच भात्यातील बाण काढून स्वतःच्या नेत्रांकडे नेतात आणि नेत्र काढून देवीला अर्पण करणार, तेवढ्यात देवी त्यांचा हात धरते आणि प्रसन्नतेने आशीर्वाद देते. ‘राजीव’ या शब्दाचा अर्थ आहे सूर्यप्रकाशी कमळ, तसेच पाणीदार डोळे !
४. गोस्वामी तुलसीदास यांनी केलेले रामाच्या नेत्रांचे वर्णन !
गोस्वामी तुलसीदास रामाच्या नेत्रांचे वर्णन करतांना म्हणतात, ‘राजीव लोचन स्रवत जल तन ललित पुलकावलि बनी ।’ अर्थ : कमळासारख्या डोळ्यांतून अश्रू वहात आहेत. शरीर आनंदाने रोमांचित झाले आहे.
५. श्रीराम राजीवलोचन आहेत !
‘राजीव’ या शब्दाचा अजून एक अर्थ आहे गुणसंपन्न व्यक्ती ! राजीव म्हणजे दयाळू, परोपकारी दृढ व्रती, विवेकी व्यक्ती. अजूनही एक अर्थ सापडतो तो, म्हणजे कर्तव्याचे पालन करतांना बुद्धी आणि विवेक नित्य जागृत ठेवून निर्णय घेणारा ! कोणत्याही अर्थाने श्रीराम राजीवलोचन आहेतच. माणसाचे व्यक्तीमत्त्व, त्याचा स्वभाव त्याच्या डोळ्यांत प्रतिबिंबित होत असतो. श्रीरामांचे डोळे अत्यंत पाणीदार, पारदर्शक, चैतन्यमय आणि परक्यालाही आपलेसे करणारे आहेत.
६. श्रीरामाचे पाणीदार नेत्र असलेली अद्वितीय मूर्ती !
२२ एप्रिल २०२४ या दिवशी आपण सगळ्यांनीच अयोध्येतील रामलल्लाचे पाणीदार डोळे पाहिले. त्या मूर्तीने प्रत्येकाला वेड लावले. आज कलियुगातील एका मूर्तीच्या नेत्राचा एवढा प्रभाव, तर प्रत्यक्ष श्रीरामाचे लोचन केवढे प्रभावी असतील ना ? म्हणूनच श्रीसमर्थ म्हणतात, ‘राजीवलोचन जय जय राम’ !
– श्रीमती स्नेहल पाशुपत, चिंचवड, पुणे.
(साभार : ‘श्रीरामनामावली’ या पुस्तकातून)