महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आणि गोंदियातील ६ तालुके अद्यापही नक्षलग्रस्त !

लोकसभा निवडणुकीत मतदान लवकर आटोपण्याची ओढवते नामुष्की !

गडचिरोली जिल्हा

मुंबई, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकतीच  नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची बैठक घेऊन नक्षलवादाचा कायमचा बीमोड करण्याची घोषणा केली; मात्र महाराष्ट्रात अद्यापही संपूर्ण गडचिरोली जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यातील ६ तालुके नक्षलग्रस्त म्हणून ओळखले जात आहेत. नुकत्याच घोषित झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या नियोजित कार्यक्रमानुसार नक्षली कारवायांमुळे येथे मतदान लवकर थांबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील नक्षली कारवायांमध्ये पूर्वीच्या तुलनेत घट झाली आहे, ही वस्तूस्थिती आहे; मात्र राज्यातील काही भागांत अद्यापही नक्षलवाद्यांच्या भीतीखाली निवडणुका पार पडत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या वेळीही ही नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे.
वर्ष २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यातील आमगाव, आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी, तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव अशा ५ मतदान केंद्रांवरील मतदान दुपारी ३ वाजताच थांबवण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होते; मात्र नक्षली कारवायांमुळे वरील भागांतील मतदान लवकर आटोपते घ्यावे लागते. मागील अनेक वर्षांपासून या भागात नक्षलवाद्यांच्या भयाखाली निवडणुका चालू आहेत.

‘नक्षलग्रस्त’ भागात घट; परंतु गडचिरोली नक्षलग्रस्तच !


प्रतीवर्षी जानेवारी मासात गृह विभागाकडून महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भागांचा आढावा घेतला जातो. यामध्ये नक्षलग्रस्त भागांतील कारवायांचा आढावा घेऊन त्याला ‘नक्षलग्रस्त’ म्हणून घोषित करण्यात येते. वर्ष २००४ पासून राज्यातील असे काही नक्षलग्रस्त भाग घोषित करण्यात आले आहेत. प्रतीवर्षी हा आढावा घेण्यात येतो. यामध्ये चांगल्या प्रमाणात घट होत आहे; मात्र गडचिरोली हा संपूर्ण जिल्ह्याची ओळख अद्यापही ‘नक्षलग्रस्त’ अशीच आहे.

हा आहे नक्षलग्रस्त भाग !

वर्ष २००४ मध्ये महाराष्ट्रातील गडचिरोली हा संपूर्ण जिल्हा, तसेच गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा, गोरेगाव, सडक अर्जुनी, सालेकसा, देवरी आणि अर्जुन मोरगाव हे तालुके, आमगाव पोलीस ठाण्याचा भाग ‘नक्षलग्रस्त’ म्हणून ओळखला जातो.

या भागांतील नक्षली कारवायांचा बिमोड करण्यात यश !

चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, गोंडपिंपरी, राजूरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर, पोंभूर्णा, मूल आणि सावली हे तालुके, भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखणी, लाखादू हे तालुके, नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका, तर यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा, झरीजामणी, घाटजी, आर्णी आणि वर्णी हे तालुके या भागातील नक्षली कारवायांचा बीमोड करण्यात पोलिसांना यश आले आहे.

अंधार होण्यापूर्वी मतदानपेट्या बाहेर काढाव्या लागतात ! – गडचिरोली येथे काम केलेले पोलीस अधिकारी

नक्षलग्रस्त भागात अंधार होण्यापूर्वी मतदानप्रक्रिया बंद करावी लागते. अंधार झाल्यावर नक्षलवादी मतदान पेट्या पळवून नेतात. त्यामुळे काळोख होण्यापूर्वी नक्षलग्रस्त भागातील मतदानपेट्या बाहेर हालवाव्या लागतात.

जिल्हाधिकार्‍यांचा अहवालानुसार होणार मतदानप्रक्रिया ! – राज्य निवडणूक विभाग

येत्या लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नक्षलग्रस्त भागांत किती वेळेपर्यंत मतदान घ्यावे, यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून अहवाल प्राप्त होतो. जिल्हा पोलीस अधीक्षक हा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना देतात. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरच या मतदान केंद्रांतील मतदान लवकर आटोपण्याचा निर्णय घेण्यात येतो. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर याविषयीचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडून प्राप्त होईल आणि त्यानंतर याविषयीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या एका अधिकार्‍यांनी दिली.

दीडपट वेतन आणि भत्ते देऊन पोलिसांची नक्षलग्रस्त भागांत नियुक्ती करावी लागते !

नक्षलग्रस्त भागात अंधार होण्यापूर्वी मतदानप्रक्रिया बंद .

गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांतील नक्षलग्रस्त भागांत कार्यरत असलेले राज्य राखीव पोलीस दल, बिनतारी संदेश विभाग, मोटार परिवहन विभाग, गुन्हे अन्वेषण विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाहतूक विभाग, विशेष कृती दल, नक्षलविरोधी अभियान, राज्य गुप्त वार्ता यांमध्ये काम करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना मूळ वेतन अन् महागाई भत्ता यांच्या दीडपट अधिक वेतन अन् भत्ता देऊन नक्षलग्रस्त भागांत त्यांची नियुक्ती करावा लागते. नक्षली कारवायांच्या धोक्यामुळे वर्ष २००९ पासून राज्य सरकारकडून पोलिसांसाठी अशा प्रकारे वाढीव भत्ते चालू केले आहेत.

नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी युती सरकारच्या काळात शहरी नक्षलवादाच्या विरोधात कारवाया, नक्षलग्रस्त भागात विकासकामांना भर, युवकांना रोजगार, नक्षलवादाच्या विरोधात कठोर भूमिका आदी विविध टप्प्यांत कारवाया चालू आहेत. यासह नक्षलग्रस्त भागात निवडणुकांच्या काळातही मतदान प्रक्रिया पूर्णवेळ राबवून नक्षलवाद्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करणे आवश्यक आहे.