प्रथमदर्शनी अहवालातून आश्चर्यकारक माहिती उघड !
पणजी, १२ ऑक्टोबर (वार्ता.) : शंखवाळ (सांकवाळ) येथे ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (सांकवाळचे प्रवेशद्वार म्हणजे पुरातन श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेले ठिकाण) या वारसा स्थळी ऑगस्ट २०२३ मध्ये श्री विजयादुर्गादेवीची मूर्ती स्थापन केल्याने देवीच्या काही भक्तांवर पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत. हे गुन्हे एका पोलीस हवालदाराने केलेल्या तक्रारीच्या आधारावरून नोंद केल्याची माहिती प्रथमदर्शनी अहवालातून उघड झाली आहे.
वारसा स्थळी श्री विजयादुर्गादेवीची मूर्ती स्थापना केल्यानंतर चर्च संस्थेशी निगडित व्यक्तींनी याला आक्षेप घेतला होता आणि याचे पडसाद राज्यभर उमटले होते. त्याचप्रमाणे घटना घडल्यानंतर दुसर्या दिवशी फादर केनिथ टेलीस आणि इतर यांनी वारसा स्थळी अनधिकृतपणे प्रवेश करून एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दोषींवर कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी जमलेल्या जमावाने केली होती; मात्र आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे यामधील एकानेही श्री विजयादुर्गादेवीची मूर्ती स्थापन केल्यासंबंधी पोलिसांकडे लेखी तक्रार केलेली नाही. एका पोलीस हवालदाराच्या नावाने तक्रार करण्यात आलेली आहे. यामुळे पोलीस हवालदाराला बळीचा बकरा बनवला जात आहे का ? असा प्रश्न भक्तगणांना पडला आहे.