अल्प कालावधीमध्ये जास्तीचा परतावा मिळणार्या आमिषाला फसल्याचा परिणाम !
संभाजीनगर – १ लाख रुपयांना १० सहस्र रुपयांचे व्याज देण्याचे आमीष दाखवून शेकडो नागरिकांना फसवल्याचे छत्रपती संभाजीनगर येथे उघड झाले आहे. सिडको एन् – २ येथील ज्ञानोबा अर्बन क्रेडिट सोसायटीला टाळे लावून संचालक मंडळातील सदस्य, बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी पळून गेल्याने ठेवीदार अस्वस्थ झाले असून त्यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाणे अन् जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार प्रविष्ट केली आहे. नवीन अन् जुन्या नागरी आणि अर्बन बँका जास्तीच्या व्याजाचे प्रलोभन दाखवतात. मार्केटिंगसाठी तसा प्रचार करतात. ‘नागरिकांनी त्याला भुलून आर्थिक फसगत करून घेऊ नये’, असे आवाहन तज्ञांनी केले आहे.
सीमा सुरक्षा दलातील अधिकारी आणि सैनिक यांनीही ज्ञानोबा सोसायटीमध्ये २ कोटी रुपये गुंतवले होते. कूचबिहार येथील कार्यरत सीमा सुरक्षा दलाच्या १३८ बटालियन मधील एक निवृत्त सैनिक या पतसंस्थेचा एजंट बनला होता. त्याने बटालियनमधील अधिकारी आणि सैनिक यांना भरपूर परताव्याचे आमीष दाखवून ठेव ठेवण्यास भाग पाडले.