दगडफेक करणार्‍या आरोपींना दांडक्याने मारणे, हा छळ मानण्यात येऊ नये !  – गुजरात पोलीस

मारहाणीचा आरोप असणार्‍या पोलिसांची उच्च न्यायालयाला विनंती

कर्णावती (गुजरात) – गुजरातच्या खेडा जिल्ह्यात गेल्या वर्षी काही मुसलमानांना दगडफेक केल्याच्या प्रकरणी पकडून त्यांच्या पार्श्‍वभागावर दांडक्याने मारहाण करण्यात आली होती. ‘या मारहाणीच्या घटनेला छळ म्हणण्यात येऊ नये’, असे या प्रकरणातील ४ पोलीस अधिकार्‍यांनी गुजरात उच्च न्यायालयात म्हटले. येथील उंधेला गावामध्ये नवरात्रीच्या गरबा कार्यक्रमावर ही दगडफेक करण्यात आली होती. पकडलेल्या मुसलमानांना चौकात एका खांबाला बांधून चोपण्यात आले होते.

आरोपी पोलिसांच्या अधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगितले की, हे पोलीस गेली १० ते १५ वर्षे कार्यरत आहेत. जर त्यांना दोषी ठरवून शिक्षा केली गेली, तर त्यांच्या कामाच्या नोंदीवर (रेकॉर्डवर) त्याचा वाईट परिणाम होईल.