परमाणु क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा व्लादिमिर पुतिन यांचा धक्कादायक दावा !

  • जगावर तिसर्‍या महायुद्धचे ढग गडद !

  • ‘परमाणु परीक्षण प्रतिबंध करारा’तून बाहेर पडण्याचेही रशियाचे संकेत !

  • जगात सर्वाधिक परमाणु शस्त्रास्त्रे रशियाकडे, अमेरिका दुसर्‍या क्रमांकावर !

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

मॉस्को (रशिया) : जगातील सर्वांत मोठी परमाणु शक्ती असलेल्या रशियाने बरेवेस्तनिक येथे परमाणु क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी केल्याचा धक्काधायक दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी स्वतः केला. तथापि ही चाचणी केव्हा केली ?, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. यासंदर्भात पुतिन यांनी ५ ऑक्टोबर या दिवशी ‘आम्ही रशिया ३ दशकांनंतर पुन्हा एकदा परमाणु परीक्षणास आरंभ करू शकतो. यासाठी ‘परमाणु परीक्षण प्रतिबंध करारा’तून आम्ही बाहेरही पडू शकतो’, असे विधान केले होते.

(सौजन्य : Oneindia Hindi | वनइंडिया हिंदी)

पुतिन पुढे म्हणाले, ‘‘रशियाच्या परमाणु धोरणात कुठलाही पालट करण्याची आवश्यकता नाही. रशियावर आक्रमण झाल्यास संबंधित देशावर आम्ही क्षणार्धात शेकडो परमाणू क्षेपणास्त्रे डागू. तथापि तुर्तास तरी रशियावर कुठलेही संकट नाही. रशियाने अत्याधुनिक आंतरमहाद्वीपीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांवरील काम जवळपास पूर्ण केले आहे. ही क्षेपणास्त्रे एकाच वेळी १० हून अधिक परमाणु शस्त्रास्त्रांचे वहून करू शकतात.’’

फेब्रुवारी २०२३ च्या आरंभी पुतिन यांनी परमाणु क्षेपणास्त्रांच्या तैनातीची संख्या निर्धारित करणारा अमेरिकेसमवेतचा करार मोडित काढला आहे.

रशियाच्या ‘रूबल’चे अवमूल्यन !

पुतिन यांच्या दाव्यानंतर लगेचच रशियाचे चलन ‘रूबल’चे मूल्य अल्प झाले. फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेनशी युद्ध चालू करण्यापूर्वी एका अमेरिकी डॉलरमागे ८० रुबल मोजावे लागत होते.

युद्ध चालू झाल्यावर रूबलचे मूल्य घसरले. पुतिन यांच्या या वक्तव्यानंतर आता त्याचे मूल्य एका डॉलरमागे अजून घसरले असून ते १०० रूबलपेक्षाही खाली गेले आहे.