शीख तरुणाला ९ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

ब्रिटनच्या महाराणीच्या हत्येचा प्रयत्न केल्याचे प्रकरण

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनच्या दिवंगत महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची वर्ष २०२१ मध्ये हत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी भारतीय वंशाच्या २१ वर्षीय तरुणाला ब्रिटनच्या न्यायालयाकडून ९ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

जसवंत सिंह चैल असे त्याचे नाव आहे. त्याने वर्ष २०२१ मध्ये नाताळाच्या वेळी महाराणीच्या महालामध्ये तिला ठार मारण्याचा कट रचला होता. या वेळी त्याने शस्त्र घेऊन महालात प्रवेशही केला होता.

त्या वेळी त्याला अटक करण्यात आली. वर्ष १९१९मधील भारतातील अमृतसर येथील जालियनवाला बागेतील नरसंहाराच्या घटनेचा सूड उगवण्यासाठी महाराणीची हत्या करू इच्छित होता, असे त्याने एका व्हिडिओद्वारे सांगितले होते. त्याची मानसिक स्थिती लक्षात घेऊन न्यायालयाने त्याला केवळ ९ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.