ट्रुडो आणि झेलेंस्की मूर्ख ! – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सुनावले

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन व कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

मॉस्को (रशिया) – कॅनडाच्या संसदेत काही दिवसांपूर्वी हिटलरच्या नाझी सैन्यातील एका निवृत्त सैनिकाला आमंत्रित करून त्याचा सन्मान केल्याच्या प्रकरणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर टीका झाली होती. यानंतर संसदेच्या अध्यक्षांनी त्यागपत्रही दिले होते. सन्मानाच्या वेळी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की हेही उपस्थित होते. यावरून रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी ट्रुडो आणि झेलेंस्की यांच्यावर टीका करत दोघांना मूर्ख म्हटले आहे.

पुतिन झेलेंस्की यांना उद्देशून म्हणाले, ‘‘हिटलरच्या सैन्याने रशियाशी (त्या काळी युक्रेन सोव्हिएत रशियाचा भाग होता) युद्ध केले होते, हेही त्यांना ठाऊक नसेल, तर ते मूर्ख आहेत. ते शाळेत गेलेच नाहीत. कॅनडाच्या संसदेत नाझी सैनिकाचा सन्मान केला जात होता आणि तेथे युक्रेनचे राष्ट्राध्यक्षही उपस्थित होते. ते एक ज्यू आहेत. त्यांच्यात ज्यूंचे रक्त आहे.’’ नाझी सैनिकांनी ज्यूंचा वंशसंहार केला होता.

भारतासमोर पाश्‍चात्त्यांची डाळ शिजली नाही ! – पुतिन यांनी फटकारले

पुतिन या वेळी म्हणाले की, पंतप्रधान मोदी राष्ट्रहितासाठी देशाचे नेतृत्व करत आहेत. ते (पाश्‍चात्त्य देश) डोळे बंद करून त्यांचे अनुकरण न करणार्‍या प्रत्येक व्यक्तीला शत्रू म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्यांनी भारतासमवेतही हेच करण्याचा प्रयत्न केला; मात्र भारतासमोर त्यांची डाळ शिजली नाही. ते भारतावर नियंत्रण मिळवू शकले नाहीत. अजूनही ते प्रयत्न करत आहेत, यात शंका नाही. आम्हीही हे चांगल्या प्रकारे समजत आहोत.