केंद्रीय यंत्रणांकडून बंगाल, तेलंगाणा आणि तमिळनाडू येथे धाडी !

तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्याच्या निवासस्थानी धाड

नवी देहली – अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर विभाग यांनी बंगाल, तेलंगाणा आणि तमिळनाडू येथे ५ ऑक्टोबर या दिवशी धाडी घातल्या. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सरकारमधील मंत्री रथिन घोष यांच्या निवासस्थानी, तसेच त्यांच्याशी संबंधित अन्य १२ ठिकाणांवर या धाडी घालण्यात आल्या. राज्यातील  उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील टीटागड नगरपालिकेचे माजी अध्यक्ष प्रशांत चौधरी यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने धाड घालून त्यांची चौकशी केली. नगरपालिकेतील नोकरभरती घोटाळ्याच्या प्रकरणी प्रशांत चौधरी यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे.

तेलंगाणामध्ये भाग्यनगर येथे आयकर विभागाने सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचे आमदार मंगती गोपीनाथ यांच्या घरावर धाड घातली. तसेच तमिळनाडूमधील द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रविड प्रगती संघ) पक्षाचे खासदार एस्. जगतरक्षक यांच्या ठिकाणांवर धाडी घातल्या.