पुणे जिल्‍हा परिषदेने केलेल्‍या माध्‍यमिक शाळांच्‍या मूल्‍यांकनामध्‍ये ६१३ शाळा ‘नापास’ !

केवळ ६ शाळांना ७० टक्‍क्‍यांहून अधिक गुण !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – जिल्‍ह्यातील अनुदानित आणि अंशत: अनुदानित माध्‍यमिक शाळांतील विद्यार्थ्‍यांच्‍या गुणवत्तेच्‍या आधारे शाळांचे मूल्‍यांकन आणि स्‍तरनिश्‍चिती (२०२२-२३) करण्‍यात आली. या मूल्‍यांकन अहवालात ६१३ शाळा (७६.७२ टक्‍के) ‘नापास’ (अनुत्तीर्ण) झाल्‍या आहेत. केवळ १८६ शाळा (२३.२७ टक्‍के) या ‘उत्तीर्ण’ झाल्‍या आहेत. त्‍यांतील ६ शाळांना ७० टक्‍क्‍यांहून अधिक गुण प्राप्‍त झाले आहेत. शाळांचे मूल्‍यांकन करून त्‍यांचे गुण टक्‍केवारीमध्‍ये दिले आहेत. हे मूल्‍यांकन पुणे जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमिक शिक्षण विभागाने केले आहे. त्‍यातून शाळांची गुणवत्ता ढासळली असल्‍याचे वास्‍तव समोर आले आहे.

जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमिक शिक्षण विभागाने जिल्‍ह्यातील ७९९ शाळांचे मूल्‍यांकन केले. त्‍यांनी दिलेल्‍या निकषांनुसार शाळांचे मूल्‍यांकन करण्‍यासाठी तालुका आणि विभागनिहाय समिती स्‍थापन करण्‍यात आल्‍या होत्‍या. या समित्‍यांद्वारे शाळांनी केलेल्‍या स्‍वयंमूल्‍यमापनाची छाननी आणि गुणांकन करण्‍यात आले. या मूल्‍यांकनामध्‍ये शहरातील नामांकित अनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांचा स्‍तर खालावल्‍याचे दिसून आले. जिल्‍हा परिषदेच्‍या शिक्षणाधिकारी (माध्‍यमिक) सुनंदा वाखारे म्‍हणाल्‍या की, शाळांची स्‍तरनिश्‍चिती करण्‍यासाठी मूल्‍यांकनाची काठिण्‍य पातळी वाढवली होती. त्‍यामुळे मूल्‍यांकनात उत्तीर्ण होणार्‍या शाळांची संख्‍या न्‍यून दिसत आहे. त्‍यावरून शाळांची गुणवत्ता ढासळली आहे, हे म्‍हणणे योग्‍य नाही.

संपादकीय भूमिका :

  • या शाळांचा दर्जा वाढवण्‍यासाठी प्रशासन काय उपाययोजना करणार आहे ?
  • शिक्षणाचे माहेरघर असणार्‍या पुण्‍यात शेकडो शाळा मूल्‍यांकनामध्‍ये अनुत्तीर्ण होणे, हे शिक्षण विभागाला लज्‍जास्‍पद !