छत्रपती संभाजीनगर – येथील शासकीय घाटी रुग्णालयात २४ घंट्यांत १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये २ बालकांचा समावेश आहे. घाटी रुग्णालयात ज्या रुग्णांचा मृत्यू झाला, त्यांना इतर रुग्णालयांतून गंभीर अवस्थेत असतांना भरती करण्यात आले आहे. या घटनेनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सौजन्य टीव्ही ९
घाटी रुग्णालय हे छत्रपती संभाजीनगर येथील एक मोठे आणि महत्त्वाचे रुग्णालय आहे. केवळ मराठवाडाच नव्हे, तर आसपासचे १२ ते १४ जिल्ह्यांतील गरीब रुग्ण या रुग्णालयावर अवलंबून आहेत. प्रतिदिन सहस्रो रुग्ण येथे उपचारांसाठी येतात. या घटनेमुळे शासकीय रुग्णालयांना पुरवण्यात येणारा अपुरा निधी, अपुर्या सोयीसुविधा, निधीअभावी औषधांचा अभाव, थांबलेली नवीन कर्मचार्यांची भरती अशी अनेक सूत्रे ऐरणीवर आली आहेत. घाटी रुग्णालयातही १५ दिवस पुरेल इतकाच औषधांचा साठा असल्याची माहिती आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील मृत्यू औषधांअभावी नाही ! – डॉ. संजय राठोड, अधिष्ठाता, घाटी रुग्णालय
घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड म्हणाले की, घाटी रुग्णालयात ज्या १० रुग्णांचा मृत्यू झाला, ते सर्व रुग्ण घाटीत बाहेरून आलेले होते. त्यांच्यावर उपलब्ध सर्व उपचार करण्यात आले. औषध नसल्यामुळे कुठलाही मृत्यू झालेला नाही. घाटी रुग्णालयात अत्यावश्यक औषधांचा पुरवठा १ मास पुरेल इतका आहे. त्यामुळे जे मृत्यू झाले आहेत, त्यांची कारणे वेगळी आहेत. हृदयविकाराच्या झटक्याने, तसेच किडनी निकामी होणे, यकृत निकामी होणे आणि रस्ते अपघात यांमुळे हे मृत्यू झाले आहेत. घाटी रुग्णालयात १ सहस्र १७७ खाटा असतांनाही २ सहस्र रुग्णांवर उपचार केले जातात. मराठवाड्यासह १४ जिल्ह्यांतील रुग्ण घाटी रुग्णालयात भरती होतात. घाटी रुग्णालयातील आधुनिक वैद्यांच्या उपचारांवर रुग्णांचा विश्वास आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे.