नांदेडमधील शासकीय रुग्‍णालयात २४ घंट्यांत २४ रुग्‍णांचा मृत्‍यू !

प्रतीकात्मक छायाचित्र

नांदेड – येथील डॉ. शंकरराव चव्‍हाण शासकीय रुग्‍णालयात २४ घंट्यांत २४ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. यामध्‍ये १२ नवजात बालकांचा समावेश असून सर्पदंश आणि विषबाधा यांमुळे १२ जणांचा मृत्‍यू झाल्‍याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शासकीय रुग्‍णालयाचे अधिष्‍ठाता यांनी ‘मृतांमध्‍ये बाहेरील रुग्‍णांचा अधिक समावेश होता’, असे स्‍पष्‍टीकरण दिले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्‍याची मागणी रुग्‍णांच्‍या कुटुंबियांकडून केली जात आहे.

रुग्‍णालय प्रशासनाचा खुलासा ! 

७० ते ८२ किलोमीटर परिसरात असे मोठे रुग्‍णालय नाही. त्‍यामुळे या परिसरातील सर्व रुग्‍ण उपचारासाठी येथे येतात. या रुग्‍णालयात किरकोळ आजारासह प्रामुख्‍याने सर्पदंश झालेले रुग्‍ण मोठ्या संख्‍येने उपचारासाठी येत असतात. सर्पदंशावर उपचार करण्‍यासाठी मुंबईच्‍या ‘हाफकिन’ संस्‍थेच्‍या माध्‍यमातून औषध मागवले जाते. सध्‍या काही प्रमाणात येथे सर्पदंशावरील औषधांची कमतरता आहे; मात्र रुग्‍णांच्‍या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन स्‍थानिक पातळीवरही सर्पदंशावरील औषध मागवून रुग्‍णांवर उपचार केले जातात. मोठ्या संख्‍येने रुग्‍ण येथे उपचारासाठी येत असल्‍याने रुग्‍णालयावर ताण असल्‍याचा खुलासा रुग्‍णालयाचे अधिष्‍ठाता एस्.आर्. वाकोडे यांनी केला आहे.

संपादकीय भूमिका

यातील उत्तरदायींवर प्रशासन काय कारवाई करणार आहे ? शासकीय रुग्‍णालयांत होणारे हे मृत्‍यूचे तांडव रोखण्‍यासाठी प्रशासन काही उपाययोजना करणार कि नाही ?