प्रेषित महंमद पैगंबर यांच्या विरोधात सामाजिक माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केल्याचे गोवाभर तीव्र पडसाद

मडगाव, फोंडा आणि म्हापसा येथे तणाव : संशयिताच्या अटकेसाठी सहस्रो मुसलमान विविध पोलीस ठाण्यांसमोर एकवटले !

फोंडा पोलीस ठाण्यात एकवटलेले मुसलमान

मडगाव, ३० सप्टेंबर (वार्ता.) : प्रेषित महंमद पैगंबर यांच्या विरोधात ‘इन्स्टाग्राम’वर आक्षेपार्ह माहिती (‘पोस्ट’) प्रसारित केल्याचे तीव्र पडसाद गोवाभर उमटले आहेत. मडगाव, फोंडा आणि म्हापसा येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. संशयिताला त्वरित कह्यात घेण्याची मागणी मडगाव, फोंडा आणि म्हापसा येथे मुसलमानांनी संबंधित पोलिसांकडे केली आहे. मडगाव येथील दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयात मुसलमानांनी ‘जोपर्यंत दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही’, असा पवित्रा घेतला आहे.

(सौजन्य : prime media goa) 

आक्षेपार्ह माहिती (पोस्ट) प्रसारित झाल्यानंतर प्रथम २९ सप्टेंबर या दिवशी रात्री मायणा-कुडतरी आणि फातोर्डा पोलीस ठाण्यांवर नागरिकांनी तक्रारी केल्या. तसेच मडगाव येथेही या वेळी संशयितावर कारवाई करण्याची मागणी करत मोठ्या संख्येने मुसलमानांनी पोलीस ठाण्यावर उपस्थिती लावली आणि यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर ३० सप्टेंबर या दिवशी सकाळी संबंधित आक्षेपार्ह माहिती (पोस्ट) प्रसारित केल्याच्या प्रकरणी मडगाव, फोंडा आणि म्हापसा येथे पोलीस ठाण्यात जाऊन संशयिताला त्वरित कह्यात घेण्याची मागणी करण्यात आली. मडगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई या वेळी जमावाला संबोधून म्हणाले, ‘‘पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली आहे आणि या प्रकरणाचे अन्वेषण केले जात आहे. सायबर पोलीस आणि अन्य यंत्रणा यांना कळवण्यात आले आहे. दोषीवर निश्‍चितच कारवाई होणार आहे.’’

पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करूनही काही जण पोलिसांचे म्हणणे ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. पावसाची संततधार चालू असूनही त्याचा आंदोलनावर कोणताही परिणाम झाला नाही. पोलीस दलाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सासष्टीतील अन्य पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक आणि पोलीस कुमक दक्षिण गोवा मुख्यालयात मागवून घेतली आहे.

आंदोलनाला राजकीय पक्षांचाही पाठिंबा

काँग्रेसचे नेते राजेश वेरेकर आणि मगोपचे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी फोंडा पोलीस ठाण्यात उपस्थिती लावून मुसलमानांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

संशयिताच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंद

दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन म्हणाले, ‘‘आक्षेपार्ह माहिती (पोस्ट) प्रसारित केल्याच्या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंदवण्यात आला आहे आणि या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ‘सायबर गट’ निर्माण करण्यात आला आहे.’’