मुंबई, २६ सप्टेंबर – २६ नोव्हेंबर २००८ च्या रात्री मुंबईवर झालेल्या आतंकवादी आक्रमणातील संशयित आरोपी तहव्वूर हुसैन राणा याच्या विरोधात मुंबई पोलिसांनी बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून ४०५ पानांचे आरोपपत्र २५ सप्टेंबर या दिवशी विशेष न्यायालयात सादर केले आहे. आक्रमणाच्या १५ दिवस आधी राणा मुंबईत आला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. तसेच या आक्रमणातील आरोपी डेव्हिड हेडली याने राणा यास ईमेल पाठवल्याची, तसेच राणासमवेत एकत्रित प्रवास केल्याचीही माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.