सर्वोच्च न्यायालयाकडून महाराष्ट्रातील सर्व दुकानांच्या नावांची पाटी मराठीत लावणे अनिवार्य !

राज्यातील सर्व दुकानांना नावाची पाटी मराठीत लावणे अनिवार्य

मुंबई – मुंबईसह राज्यातील सर्व दुकानांना नावाची पाटी मराठीत लावणे सर्वोच्च न्यायालयाकडून अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी न्यायालयाने राज्यातील सर्व व्यापारी संघटनांना २ मासांचा कालावधी दिला असून कोर्टकचेरीत पैसा व्यय करण्यापेक्षा मराठी पाट्यांसाठी पैसे व्यय करा, या शब्दांत न्यायालयाने व्यापार्‍यांची कानउघडणी केली आहे. २६ सप्टेंबर या दिवशी न्यायमूर्ती बी.व्ही. नागराथन् आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली.

१. येत्या २ मासांत मुंबईसह राज्यभरातील सर्व दुकाने आणि आस्थापनने यांच्या नावांची पाटी मराठी भाषेत दिसण्यास प्रारंभ होईल, असे मत या वेळी न्यायालयाने व्यक्त केले.

२. महाराष्ट्र शासनाने वर्ष २०२२ मध्ये दुकानांवर मराठी पाटी लावणे अनिवार्य केले होते. या निर्णयाच्या विरोधात व्यापारी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने शासनाच्या बाजूने न्याय दिल्यावर ‘फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन’ने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

३. यावर निर्णय देतांना सर्वोच्च न्यायालयाने ‘कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही स्थानिक भाषेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असेल, तर तिथे व्यवसाय करतांना तुम्हाला तो मान्य करायला काय हरकत आहे ? शेवटी तुमचे ग्राहक स्थानिक रहिवासीच असणार आहेत. आम्ही पुन्हा तुम्हाला मुंबई उच्च न्यायालयात पाठवले, तर तुम्हाला मोठा आर्थिक दंडही सहन करावा लागेल’, असे म्हटले. याविषयीची पुढील सुनावणी डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

मराठी पाटीवर महाराष्ट्र सैनिकांचेही लक्ष असेल, हे विसरू नका ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे


मुंबई – दुकानदारांनीही नसत्या भानगडीत पडू नये. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. दुकानांच्या नावांची पाटी मराठी भाषेत असावी, यासाठी राज्यशासन लक्ष ठेवेल आणि कारवाई करील; पण याकडे माझ्या महाराष्ट्र सैनिकांचेही लक्ष असेल, हे विसरू नका, असे ‘ट्वीट’ मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. राज्यातील सर्व दुकानांना मराठीत पाटी लावण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यावर राज ठाकरे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविषयी राज ठाकरे यांनी अभिनंदनही केले आहे.