कॅनडामध्ये भारतीय दूतावासांबाहेर खलिस्तान्यांची निदर्शने

भारतीय राष्ट्रध्वज जाळला !

व्हँकुव्हर (कॅनडा) – कॅनडामध्ये २५ सप्टेंबर या दिवशी २ ठिकाणी भारताच्या विरोधात खलिस्तान्यांनी निदर्शने केली. या वेळी भारताचे राष्ट्रध्वज, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्यात आला. ही निदर्शने ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने आयोजित केली होती.

१. व्हँकुव्हर येथे भारतीय दूतावासाबाहेर खलिस्तान्यांनी निदर्शने केली. त्यांच्याकडून भारतविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच भारताचा राष्ट्रध्वज फाडण्यात आला.

२. ओटावा येथेही भारतीय दूतावाबाहेर निदर्शने करण्यात आली. या वेळी केवळ ३० शीख यात सहभागी झाले होते. पूर्वीच्या तुलनेत खलिस्तान्यांची संख्या अल्प होत आहे, असे यातून निदर्शनास आलेे

भारत ‘ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया’ कार्ड रहित करण्याच्या सिद्धतेत !

भारतीय दूतावासाबाहेर निदर्शने करणार्‍या खलिस्तान्यांची ओळख पटवण्याचे काम भारताने चालू केले आहे. यानंतर भारत सरकार या सर्व आंदोलकांचे ‘ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया’ कार्ड रहित करणार आहे. हे कार्ड परदेशात स्थायिक झालेल्या भारतियांना दुहेरी नागरिकत्व प्रदान करते. जर हे कार्ड रहित झाले, तर कॅनडात स्थायिक झालेले खलिस्तानी भारतात परत येऊ शकणार नाहीत. या भीतीने ते उघडपणे पुढे येण्याचे टाळत आहेत.