देशविघातक शक्तींना बनावट ओळखपत्रे देणार्‍या टोळ्या भारतात कार्यरत !

  • महाराष्ट्रातही घुसखोर !

  • महाराष्ट्र पोलीस युद्धपातळीवर राबवणार शोधमोहीम !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – घुसखोर आणि देशविघातक कारवाया करणारे यांना बोगस ओळखपत्रे देणार्‍या काही टोळ्या भारतात कार्यरत आहेत. हे घुसखोर देशविघातक कार्यामध्ये गुंतले असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या निर्देशनास आली आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना याविषयी सतर्कतेची सूचना दिली आहे. केंद्रशासनाच्या निर्देशानंतर महाराष्ट्र पोलीस घुसखोरांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम युद्धपातळीवर हाती घेणार आहेत. याविषयी राज्याच्या गृहविभागाने २५ सप्टेंबर या दिवशी शासनचा आदेश काढला आहे.

या टोळ्या भारतीय पारपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड आदी बनावट कागदपत्रे बनवून देशविघातक शक्ती आणि घुसखोर यांना देत आहेत. यामध्ये स्थानिक प्राधिकरणावरही या टोळ्या प्रभाव पाडत असल्याचे म्हणजे संबंधित शासकीय अधिकार्‍यांना पैसे देऊन त्यांच्याकडून बनावट ओळखपत्रे बनवून घेत असल्याचे केंद्रीय सुरक्षा यंत्रणांच्या लक्षात आले आहे.

अन्य राज्यांचे रहिवासी दाखवून महाराष्ट्रात प्रवेश !

यामध्ये हे घुसखोर भारतातील उत्तर आणि पूर्व राज्यांमध्ये प्रवेश करत आहेत. तेथील रहिवासी असल्याचे ओळखपत्र मिळवून त्या आधारे महाराष्ट्रात प्रवेश करत आहेत. अन्य राज्यांतील ओळखपत्रांचा उपयोग करून हे घुसखोर महाराष्ट्रात पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, रेशनकार्ड, आधारकार्ड आदी ओळखपत्रे मिळवत असल्याचे सुरक्षायंत्रणांच्या लक्षात आले आहे.

प्रत्यक्ष निवासस्थानी जाऊन महाराष्ट्र पोलीस करणार खात्री !

भारतीय पारपत्र देतांना अर्जदाराचा पत्ता, गुन्हेगारी पूर्वइतिहास, ओळखपत्र यांची पडताळणी केल्यानंतर महाराष्ट्र पोलीस ओळखपत्रावर दिलेल्या पत्त्यावर जाऊन प्रत्यक्ष खात्री करण्यात आहेत. याविषयीच्या पडताळणीचा अहवाल पोलिसांकडून पारपत्र विभागाला देण्यात येणार आहे.