कॅनडातील खलिस्तानी आतंकवाद्यांना भारतातून हवालाच्या माध्यमातून मिळाले कोट्यवधी रुपये !

  • ‘एन्.आय.ए.’च्या आरोपपत्रामध्ये मोठा खुलासा !

  • वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांत भारतातून हवालामार्गे तब्बल १३ वेळा मोठ्या रकमा कॅनडात पाठवण्यात आल्या !

(हवाला म्हणजे दक्षिण आशिया देशांमध्ये पैसे हस्तांतरित करण्याची पारंपरिक पद्धत. यामध्ये एजंटला पैसे देऊन त्यांच्या मार्फत संबंधितांपर्यंत पैसे पोचवले जातात.)

नवी देहली – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर हरदीप सिंह निज्जर या खलिस्तानी आतंकवाद्याच्या हत्या प्रकरणात केलेल्या आरोपांनंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने खलिस्तान्यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. यंत्रणेने खलिस्तानी चळवळीची भारतातील पाळेमुळे खणून काढण्याचे काम हाती घेतले असून यासंदर्भात तिने प्रविष्ट केलेल्या आरोपपत्रामधून मोठे खुलासे करण्यात आले आहेत. यंत्रणेने आरोपपत्रामध्ये भारतातून कॅनडातील खलिस्तान्यांना हवालाच्या माध्यमातून पैसा पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

१. आरोपपत्रानुसार वर्ष २०१९ ते २०२१ या ३ वर्षांच्या काळात भारतातून तब्बल १३ वेळा कॅनडा आणि थायलंड येथे हवालाच्या माध्यमातून पैसा पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये ५ लाख रुपयांपासून ६० लाख रुपयांपर्यंतच्या रकमांचा समावेश आहे.

२. हा पैसा लॉरेन्स बिष्णोई याच्या माध्यमातून कॅनडातील खलिस्तान्यांपर्यंत पोचवला जात असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ या खलिस्तानी संघटनेचा प्रमुख लखबीर सिंह लांडा याच्या साहाय्याने बिष्णोईने हा सगळा पैसा फिरवल्याचेही या आरोपपत्रामध्ये सांगण्यात आले आहे.

३. खंडणी, अनधिकृत मद्यविक्री आणि शस्त्रास्त्रांची तस्करी यांतून जमा केलेला पैसा लॉरेन्स बिष्णोईचा साथीदार गोल्डी ब्रार आणि सतबीर सिंह उपाख्य सॅम या दोघांकडे आधी हस्तांतरित व्हायचा. तेथून तो कॅनडातील इतर संघटनांना दिला जायचा.

४. हवालाच्या माध्यमातून कॅनडात पोचलेला हा पैसा खलिस्तानी चळवळीच्या प्रमुखांच्या माध्यमातून चित्रपट निर्मितीमध्ये, तसेच ‘कॅनडा प्रीमियम लीग’ यांसारख्या स्पर्धांमध्ये गुंतवल्याचेही ‘एन्.आय.ए.’च्या आरोपपत्रात सांगण्यात आले आहे.

५. वर्ष २०२० मध्ये गोल्डी ब्रारला दोन वेळा प्रत्येकी २० लाख रुपये पाठवण्यात आले, तर सॅमला एकूण ५० लाख रुपये पाठवले गेले. वर्ष २०२१ मध्ये गोल्डी ब्रारला प्रत्येक मासाला २ लाख रुपये पाठवण्यात आले. तसेच ब्रार आणि सॅम या दोघांना ६० लाख रुपये पाठवण्यात आले. याच वर्षी सॅमला आणखी दोन वेळा ४० लाख आणि २० लाख रुपये पाठवण्यात आले.

संपादकीय भूमिका 

  • कॅनडाने भारताच्या विरोधात अत्यंत गंभीर आरोप करूनही त्याला त्याचा एकही पुरावा देता आलेला नाही. दुसरीकडे भारताने कॅनडातील खलिस्तानी आतंकवाद्यांच्या विरोधात आरोपपत्रच प्रविष्ट केले आहे. यावरून कॅनडा आतातरी या खलिस्तान्यांच्या विरोधात कायद्याचा बडगा उगारेल का ?
  • भारताने या खलिस्तान्यांना आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यासाठी आता कंबर कसली पाहिजे !