कानपूर (उत्तरप्रदेश) येथील सरकारी कार्यालयातील धारिका (फाईल्स) स्वच्छता कर्मचार्‍यांनी रद्दीत विकल्या !

मिळालेल्या पैशांतून प्यायले दारू !  

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील समाज कल्याण विभागातील मोहन आणि रमेश हे  स्वच्छता कर्मचारी गेल्या ३ मासांपासून विभागातील नोंदणीतील (रेकार्डमधील) धारिका (फाईल्स) रद्दीच्या दुकानात जाऊन विकून मिळणार्‍या पैशांतून दारू पित होते, अशी माहिती आता समोर आली आहे. त्यांनी गेल्या ६ वर्षांतील नोंदी असलेल्या धारिका विकल्याचे उघड झाले आहे. या दोघांवर आता कारवाई करण्यात येणार आहे.

नोंदींच्या धारिकांची तपासणी चालू असतांना ही घटना उघड झाली. याविषयी या दोघा कर्मचार्‍यांची चौकशी करण्यात आल्यावर त्यांनी गुन्हा स्वीकारला. यानंतर ज्या ठिकाणी त्या धारिका विकण्यात आल्या तेथे जाऊन काही धारिका परत मिळवण्यात आल्या; मात्र त्या याच वर्षीच्या असून मागील काही वर्षांच्या धारिका मिळाल्या नाहीत.

संपादकीय भूमिका 

स्वच्छता कर्मचारी अशा प्रकारचे कृत्य करत असतांना वरिष्ठ अधिकारी आणि सुरक्षारक्षक झोपले होते का ?