भंडारा जिल्‍ह्यात ३ घंटे ढगफुटीसदृश पाऊस !

रस्‍ते जलमय, घरांमध्‍ये पाणी शिरल्‍याने नागरिकांची धावपळ !

प्रतिकात्मक चित्र

भंडारा – मागील ३ दिवसांपासून जिल्‍ह्यात जोरदार पावसाने उपस्‍थिती लावलेली असतांनाच २२ सप्‍टेंबर या दिवशी सकाळी ९ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत तुमसर आणि मोहाडी या २ तालुक्‍यांत ढगफुटीसदृश पाऊस झाला. ३ घंट्यांपर्यंत मुसळधार पाऊस झाल्‍याने जिल्‍ह्यातील जनजीवन विस्‍कळीत झाले आहे. अजूनही पाऊस चालूच आहे.

तुमसर शहरातील मुख्‍य मार्गावरून पावसाचे पाणी वाहू लागल्‍याने सर्वत्र जलमय स्‍थिती निर्माण झाली आहे. यासमवेत तुमसर वन विभागाच्‍या कार्यालयासह वन कर्मचार्‍यांच्‍या वसाहतीत मोठ्या प्रमाणात या मुसळधार पावसाचे पाणी शिरल्‍याने तिथे परिसर जलमय झाला. वसाहतीत पाणी शिरल्‍याने तेथील कुटुंबियांनी वर्षभरासाठी घेऊन ठेवलेले जीवनपयोगी साहित्‍य पाण्‍यात जाण्‍याची भीती आहे. त्‍यामुळे या वस्‍तूंची नासाडी होण्‍याची भीती वन कर्मचार्‍यांनी व्‍यक्‍त केली आहे.

अनेक ठिकाणी पूरस्‍थिती !

भंडारा जिल्‍ह्यातील मोहाडी येथील काही सखल भागात पावसाचे पाणी शिरल्‍याने नागरिकांची धावपळ झाली. या मुसळधार पावसाने अनेक नागरी वसाहती जलमय झाल्‍या आहेत. चंद्रपूर जिल्‍ह्यात २१ सप्‍टेंबर या दिवशी मुसळधार पाऊस झाल्‍याने अनेक वस्‍त्‍यांमध्‍ये पाणी शिरले होते. पूर्व विदर्भात सर्वदूर पाऊस आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने आणखी २-३ दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार, तर बहुतांश ठिकाणी हलका ते मध्‍यम पाऊस पडण्‍याची शक्‍यता वर्तवली आहे. नागपूर जिल्‍ह्यातही २ दिवसांपासून मध्‍यम ते मुसळधार पाऊस आहे.