मुंबई, २२ सप्टेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी राज्यातील ५० टक्के मतदान केंद्रांवर ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवण्यात येणार असल्याची माहिती दिली. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी या मतदानकेंद्रांवर ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील निवडणूक प्रक्रियेवर थेट मंत्रालयातून लक्ष ठेवता येणार आहे.
याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’ च्या प्रतिनिधीला अधिक माहिती देतांना श्रीकांत देशपांडे म्हणाले, ‘‘राज्यातील मतदारांच्या नावाच्या सर्वेक्षणाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणामध्ये स्थलांतरीत आणि मयत मतदारांची पडताळणी करण्यात आली. छायाचित्र व्यवस्थित नसलेल्या मतदारांकडून नव्याने अर्ज भरून घेण्यात येत आहेत. प्रत्येक मतदान केंद्रामध्ये अधिकतम १ सहस्र ५०० इतकी मतदारांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. मतदारांची संख्या वाढल्यास जवळच्या मतदानकेंद्रामध्ये त्यांचा समावेश करण्यात येईल किंवा नवीन मतदानकेंद्र सिद्ध करण्यात येईल. जिल्हाधिकार्यांकडून २५ सप्टेंबरपर्यंत नवीन मतदानकेंद्रांसाठीचे प्रस्ताव प्राप्त होणार आहेत. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानकेंद्रांची संख्या १ सहस्र ५०० ने वाढण्याची शक्यता आहे. १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदारसूचीविषयी कोणते आक्षेप असल्यास मागवण्यात येणार आहेत. ३० नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत आक्षेपांवर दुरुस्तीची कार्यवाही केली जाणार आहे. ५ डिसेंबर या दिवशी मतदारांची अंतिम सूची घोषित करण्यात येईल.’’