उदयनिधी स्टॅलिन यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस !

  • उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे प्रकरण

  • स्टॅलिन यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यासाठी प्रविष्ट करण्यात आली आहे याचिका !

नवी देहली – तमिळनाडू सरकारमधील हिदुद्रोही मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माच्या विरोधात केलेल्या संतापजनक वक्तव्यावर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सिद्धता दर्शवली आहे. यासंदर्भात उदयनिधी स्टॅलिन, ए. राजा आणि अन्य यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. असे असले, तरी न्यायालयाने या नोटिसीला त्या तिघा जणांकडून करण्यात आलेल्या विद्वेषी वक्तव्यांविरुद्धच्या याचिकेशी जोडण्यास नकार दिला आहे.

उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माचे उच्चाटन करण्याच्या वक्तव्याच्या विरोधात प्रविष्ट याचिकेच्या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने ही नोटीस बजावली. याचिकाकर्त्यांनी स्टॅलिन, तसेच सनातन धर्म उच्चाटन संमेलनाचे आयोजक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करणारी याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेत त्यांची वक्तव्ये घटनाबाह्य असल्याचे सांगून या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयीकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका 

१०० कोटी हिंदूंच्या देशात त्यांच्या धर्माविषयी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याच्या विरोधात साधा गुन्हा नोंद होण्यासाठी हिंदूंना सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करावी लागते, यापेक्षा लाजिरवाणी ती गोष्ट कोणती ? हिंदूंना त्यांच्याच देशात कोणतेच मूल्य राहिलेले नाही, हेच यावरून दिसते !