(म्‍हणे) ‘कॅनडातील हिंदूंनी त्‍वरित देश सोडून निघून जावे !’

खलिस्‍तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्‍टिस’ची धमकी !

ओटावा (कॅनडा) – बंदी घालण्‍यात आलेली खलिस्‍तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्‍टिस’ने कॅनडातील भारतीय वंशांच्‍या हिंदूंना त्‍वरित कॅनडा सोडून जाण्‍याची धमकी दिली आहे. या संघटनेचा प्रमुख आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्‍नू याने एक व्‍हिडिओ प्रसारित करून ही धमकी दिली आहे. पन्‍नू याने म्‍हटले आहे की, जे लोक केवळ भारताचे समर्थन करतात, तसेच खलिस्‍तानी समर्थक शिखांची भाषणे आणि अभिव्‍यक्‍ती यांच्‍यावरील कारवाईचेही समर्थन करतात, त्‍यांनी त्‍वरित कॅनडा सोडला पाहिजे.

या पार्श्‍वभूमीवर कॅनडाच्‍या हिंदु मंत्री अनीता आनंद यांनी देशात शांतता राखण्‍याचे आवाहन केले आहे. त्‍यांनी म्‍हटले की, दक्षिण आशियाई आणि भारत येथील नागरिकांना ट्रुडो यांचे विधान आवडलेले नाही. विधान चांगले वाटत नसेल, तरीही कायदेशीर प्रक्रिया चालू ठेवण्‍याची ही वेळ आहे.

हिंदु संघटनेने व्‍यक्‍त केली चिंता !

याविषयी ‘कॅनेडियन हिंदूज फॉर हार्मनी’ संघटनेचे प्रवक्‍ते विजय जैन यांनी म्‍हटले, ‘आम्‍ही शहरामध्‍ये सर्वत्र हिंदुद्वेष पहात आहोत. ट्रुडो यांच्‍या विधानामुळे हिंसा होऊ शकते. आम्‍हाला याची चिंता वाटू लागली आहे. वर्ष १९८५ च्‍या घटनेप्रमाणेच येथे हिंदूंना लक्ष्य केले जाऊ शकते.’ २५ जून १९८५ या दिवशी एअर इंडियाच्‍या ‘कनिष्‍क’ या विमानात बाँबस्‍फोट झाल्‍याने ते समुद्रात कोसळले होते. हे विमान अटलांटिक समुद्राच्‍या वरून जात असतांना त्‍यात स्‍फोट झाला होता. यात ३२९ जणांचा मृत्‍यू झाला होता. त्‍यांतील २८० जण हे कॅनडाचे नागरिक होते. हा बाँबस्‍फोट खलिस्‍तानी आतंकवाद्यांनी घडवून आणला होता.

संपादकीय भूमिका

हिंदू कॅनडासारख्‍या विकसित देशातही असुरक्षित असल्‍याने त्‍यांच्‍या रक्षणार्थ भारतात हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना अपरिहार्य !

अशी धमकी देण्‍याचे या संघटनेचे धाडस होतेच कसे ? कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो अशांवर कारवाई का करत नाहीत ? जगभरातील देशांनी यासाठी ट्रुडो यांना जाब विचारला पाहिजे !