उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! कु. रूपश्री गिरीश जामोदे ही या पिढीतील एक आहे !
‘वर्ष २०२२ मध्ये ‘कु. रूपश्री गिरीश जामोदे महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१४.७.२०२३) |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
भाद्रपद शुक्ल पंचमी (२०.९.२०२३) या दिवशी कु. रूपश्री गिरीश जामोदे हिचा सातवा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची आई सौ. प्राजक्ता जामोदे यांना तिच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
कु. रूपश्री जामोदे हिला सनातन परिवाराकडून सातवा वाढदिवसाच्या शुभेच्छा !
१. समजूतदार
अ. मी आणि माझे यजमान श्री. गिरीश जामोदे दिवसभर नोकरीनिमित्त घराबाहेर असूनही रूपश्री माझ्या आई-वडिलांसमवेत (वैद्या (सौ.) समिधा रमेश वरूडकर, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६२ वर्षे आणि श्री. रमेश वरूडकर, वय ६९ वर्षे) आनंदाने रहाते. त्याविषयी तिची कुठलीही तक्रार नसते.
आ. बर्याचदा काही वस्तू हवी असते; परंतु जेव्हा मी तिला ती वस्तू न घेण्यामागील कारण समजावून सांगते, उदा. आज आपण समवेत पैसे आणलेले नाहीत, तर नंतर घेऊया. तेव्हा ती शांत होते.
इ. एकदा मला अकस्मात् न्यायालयात जायचे होते. मी रूपश्रीला शाळेतून घेतले. तेव्हा तिला ताप होता. आमच्या घरी तिला सांंभाळायला कुणी नव्हते; म्हणून मी तिला समजावून सांगितले आणि एका साधिकेकडे ठेवले. तेव्हा ती तक्रार न करता साधिकेकडे राहिली.
२. देवाची आवड
कु. रूपश्री संध्याकाळी आरती करते, स्तोत्र म्हणते आणि पाच मिनिटे नामजप करते. तिला नेहमी शिवाचा नामजप करायला आवडतो. श्रीकृष्णाचा श्लोक ‘कृष्णाय वासुदेवाय ….’ आणि ‘ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे….’ हा सद़्गुरूंचा श्लोक म्हणते. ती रात्री झोपतांना प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करते. नंतर निद्रादेवीचा श्लोक म्हणून झोपते.
३. राष्ट्राभिमान
एकदा रूपश्रीला तिच्या वर्गमैत्रिणीकडे पाहिलेली लेखणी (पेन) हवी होती. आम्ही लेखणी विकत घेण्यासाठी दुकानात गेलो. तेव्हा ‘त्या प्रकारची लेखणी (पेन) चिनी बनावटीची आहे’, असे मी तिला सांगितले. तेव्हा तिने तशी लेखणी विकत घेतली नाही. या प्रसंगापूर्वी मी तिला चिनी सैनिक भारतीय सैनिकावर आक्रमण करत असल्याची ध्वनीचित्रफित (व्हिडिओ) दाखवली होती. हे तिने लक्षात ठेवून ती मला म्हणाली, ‘‘आपण भारतीय बनावटीची लेखणी घेऊ.’’ यावरून मला आणि लेखणी विकणार्या दुकानदाराला रूपश्रीचा राष्ट्राभिमान जाणवला अन् आम्ही तिचे कौतुक केले.
४. सूक्ष्मातील जाणणे
तिच्या मावशीला बाळ होणार होते. तेव्हा ‘ती स्वतःहून त्या बाळाचे नाव ‘निर्गुण’ ठेवा’, असे बर्याच वेळा म्हणाली. नंतर तिच्या मावशीला मुलगा झाला.
५. सद़्गुरु नंदकुमार जाधव यांच्याविषयी घरातील व्यक्तींचे बोलणे चालू असतांना ती लक्षपूर्वक ऐकते आणि त्या वेळी तिच्या डोळ्यांमध्ये बघितल्यास ‘ती अंतर्मनातून गुरुदेवांशी जोडली गेली आहे’, असे मला जाणवते.
६. रूपश्रीचे स्वभावदोष घालवण्यासाठी तिच्याकडून करून घेत असलेले प्रयत्न
अ. रूपश्री शाळेतून आल्यावर मी तिला सर्व साहित्य जागेवर ठेवण्यास सांगते.
आ. तिच्यातील ‘अव्यस्थितपणा’ या दोषामुळे तिने पसारा केल्यास कधी समजावून सांगून आवरायला सांगते आणि तिने ऐकले नाही, तर शिक्षापद्धतीचा अवलंब करते.
७. रूपश्रीचे स्वभावदोष
अ. अव्यवस्थितपणा
आ. आळस
इ. दूरचित्रवाणी आणि भ्रमणभाष पहाणे
– सौ. प्राजक्ता गिरीश जामोदे (रूपश्रीची आई), अमरावती
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |