धार्मिक चिन्हांमधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करा ! – शॉन क्लार्क, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

  • महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या शोधनिबंधाला बँकॉक येथील परिषदेत ‘सर्वोत्कृष्ट सादरीकरण’ पुरस्कार !

  • ‘दैवी आणि दानवी – हिंदु आणि नाझी स्वस्तिक यांच्या आध्यात्मिक अंगांचा तुलनात्मक अभ्यास’ या शोधनिबंधाचे लेखक परात्पर गुरु डॉ. आठवले, तर सहलेखक आहेत श्री. शॉन क्लार्क  !

श्री. शॉन क्लार्क यांना ‘सर्वोत्कृष्ट सादरीकरण’ पुरस्काराने गौरवतांना

मुंबई – ‘प्रत्येक चिन्हातून सूक्ष्म सकारात्मक किंवा नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असतात. बहुतांश धार्मिक नेते त्यांच्या धार्मिक चिन्हांतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांकडे लक्ष देत नाहीत आणि याचा प्रतिकूल परिणाम त्यांचे अनुयायी अन् भक्त यांवर होऊ शकतो. यासाठी धार्मिक चिन्हांमधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करायला हवा’, असे उद्गार ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या संशोधन गटाचे सदस्य श्री. शॉन क्लार्क (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांनी केले. नुकतेच बँकॉक, थायलँड येथे झालेल्या ‘टेंथ इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल सायन्सिस २०२३’या परिषदेत श्री. क्लार्क बोलत होते. त्यांनी ‘दैवी आणि दानवी – हिंदु आणि नाझी स्वस्तिक यांच्या आध्यात्मिक अंगांचा तुलनात्मक अभ्यास’, हा शोधनिबंध सादर केला. याचे लेखक परात्पर गुरु डॉ. आठवले असून श्री. क्लार्क सहलेखक आहेत.

श्री. शॉन क्लार्क

श्री. शॉन क्लार्क यांनी चिन्हांविषयी आणि विशेषतः विविध धार्मिक चिन्हांविषयी वैज्ञानिक उपकरणे अन् सूक्ष्म ज्ञान यांच्या माध्यमातून केलेले विस्तृत संशोधन विस्ताराने सादर केले. यात त्यांनी प्रामुख्याने हिंदु स्वस्तिक आणि हे स्वस्तिक ४५ अंशाने फिरवून काळ्या रंगात अन् लाल पार्श्वभूमीवर सिद्ध केलेले नाझी स्वस्तिक यांतून प्रक्षेपित स्पंदने आणि ऊर्जा यांचा अभ्यास मांडला. मूळ हिंदु स्वस्तिक चिन्हात मोठ्या प्रमाणात सकारात्मक स्पंदने आणि ऊर्जा आढळली, तर नाझी स्वस्तिक चिन्हात मोठ्या प्रमाणात नकारात्मक स्पंदने अन् ऊर्जा आढळली. एवढेच नाही, तर नाझी स्वस्तिक दंडावर बांधल्यानंतर त्या व्यक्तींमधील नकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणात वाढली, तर त्यांतील सकारात्मक ऊर्जा पूर्णतः नष्ट झाली. याउलट हिंदु स्वस्तिक दंडावर बांधल्यानंतर नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली आणि सकारात्मक ऊर्जा वाढली, असे वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून केलेल्या संशोधनातून निष्पन्न झाले.

‘ॐ’ या हिंदु धर्मातील चिन्हाचे संगणकीय फाँटमध्ये उपलब्ध दोन वेगवेगळे आकार आणि ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’निर्मित ॐ, अशा तीन ॐ चा दोन वेगवेगळ्या वैज्ञानिक उपकरणांनी अभ्यास केला. त्यात संगणकीय ॐ च्या एका आकारातून नकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होत असलेली आढळली, तर दुसर्‍या आकारात काही प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली; मात्र ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने बनवलेल्या ॐ मध्ये मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली. यावरून धार्मिक चिन्हांमधून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करणे आवश्यक आहे, हे स्पष्ट होते.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची घौडदौड !

श्री. क्लार्क यांनी सादर केलेल्या शोधनिबंधाला परिषदेत ‘सर्वोत्कृष्ट सादरीकरण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. ऑक्टोबर २०१६ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने १८ राष्ट्रीय आणि ९१ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण १०९ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १३ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट सादरीकरण’ पुरस्कार मिळाले आहेत.