परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवातील रथयात्रेत टाळ वाजवत नृत्‍य करतांना साधिकेला आलेल्‍या अनुभूती !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘चेहरा आनंदी ठेवून रथयात्रेत टाळ वाजवत नृत्‍य करायला जमेल का ?’, असे वाटून ताण येणे

‘देवाच्‍या कृपेने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवातील रथयात्रेत मला टाळ वाजवत नृत्‍य करण्‍याची संधी मिळाली. आम्‍ही नृत्‍याचा सराव १५ दिवस आधीच चालू केला होता. सरावाच्‍या वेळी उत्तरदायी साधकांनी सांगितले होते, ‘‘टाळ वाजवत नृत्‍य करतांना चेहर्‍यावरील हावभाव आनंदी आणि प्रसन्‍न वाटत नाहीत.’’ तेव्‍हा ‘टाळ वाजवत नृत्‍य करायला जमेल का ?’, असे मला वाटत होते. ‘नृत्‍य करतांना चेहरा आनंदी असायला हवा’, या विचाराचाही माझ्‍या मनावर ताण होता.

२. ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी रथयात्रेला आरंभ होताच आनंदाची स्‍पंदने जाणवणे आणि आरंभापासून शेवटपर्यंत चेहर्‍यावरील हास्‍य टिकून रहाणे

कु. मानसी अग्‍निहोत्री

ब्रह्मोत्‍सवाच्‍या आदल्‍या दिवसापासून आणि त्‍या दिवशी माझ्‍याकडून प्रार्थना होत होती, ‘मला गुरुदेव, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना अपेक्षित असे नृत्‍य करता येऊ दे अन् नृत्‍य करतांना चेहर्‍यावर आनंदी भाव दिसू दे. सर्वांचे चेहरे आनंदी दिसू दे.’ ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी रथयात्रेसाठी आम्‍ही पटांगणावर उभे राहिलो. तेव्‍हा अकस्‍मात् मला आनंदाची स्‍पंदने जाणवली. त्‍या वेळी मला आतून पुष्‍कळ आनंद वाटत होता. माझा चेहरा प्रसन्‍न वाटत होता. माझ्‍या चेहर्‍यावर हास्‍य आले आणि ‘रथयात्रेच्‍या आरंभापासून शेवटपर्यंत ते हास्‍य टिकून होते’, अशी अनुभूती मला आली.

१५ दिवस आम्‍ही नृत्‍याचा सराव केला. त्‍या वेळी मला आतून आनंद वाटत नव्‍हता. तेव्‍हा माझ्‍याकडून केवळ तेवढ्यापुरते हसणे होत होते; परंतु ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी देवाच्‍या कृपेने आतून आनंद जाणवत असल्‍यामुळे तो माझ्‍या चेहर्‍यावर उमटत होता. देवाच्‍या कृपेने हे शक्‍य झाले. ‘आंतरिक भाव देवानेच माझ्‍या चेहर्‍यावर आणला आणि मला रथयात्रेचा आनंद आतून घेता आला’, याबद्दल गुरुदेवांच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– कु. मानसी अग्‍निहोत्री, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक