नाशिक – येथील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी परराज्यातील सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. गुन्हेगारांच्या टोळीने २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी पारख यांचे अपहरण केले होते. खंडणीची रक्कम मिळाल्यानंतर त्यांनी पारख यांना सुरतजवळ सोडून दिले होते. या प्रकरणी पोलिसांनी अन्वेषण करून संशयित संशयित महेंद्र उपाख्य नारायणराम बिष्णोई, पिंटू उपाख्य देविसींग राजपूत आणि रामचंद्र बिष्णोई यांना जोधपूर (राजस्थान) येथून अटक करण्यात आली.
आरोपी महेंद्र बिष्णोई याने साथीदारांच्या साहाय्याने हेमंत पारख यांचे अपहरण करून खंडणी उकळल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले आहे. अपहरण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार इगतपुरी तालुक्यातील लहांगेवाडी येथील अनिल खराटे आहे. खराटे यानेच गुन्ह्याचा कट रचून हेमंत पारख यांच्याविषयी सर्व माहिती आरोपींना पुरवली होती. पोलिसांनी संशयितांकडून खंडणी स्वरूपात मागितलेल्या २ कोटी रकमेपैकी १ कोटी ३३ लाख रुपये हस्तगत केले आहेत, तसेच बोलेरो कँपर गाडी, देशी बनावटीचा कट्टा, ६ जिवंत काडतुसे असा ८ लाख ३२ सहस्र ५०० रुपयांचा असा एकूण १ कोटी ४१ लाख ३२ सहस्र ५०० रुपये किंमतीचा माल हस्तगत केला आहे.