राजुरा (चंद्रपूर) येथील सोमेश्‍वर मंदिरासाठी २ कोटी ४३ लक्ष रुपये निधी संमत !

मुंबई, १३ सप्‍टेंबर (वार्ता.) – चंद्रपूर जिल्‍ह्यातील आराध्‍यदैवत असलेल्‍या राजुरा येथील श्री क्षेत्र सोमेश्‍वर संस्‍थानाच्‍या संवर्धनासाठी आणि सुविधांसाठी २ कोटी ४३ लक्ष ९७ सहस्र रुपये निधी संमत झाला आहे. स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव एकछत्र योजनेच्‍या अंतर्गत सोमेश्‍वर मंदिर या राज्‍य संरक्षित स्‍मारकाच्‍या जतन आणि दुरुस्‍तीच्‍या कामांच्‍या अंदाजपत्रकास सांस्‍कृतिक कार्य विभागाने प्रशासकीय मान्‍यता दिली आहे. यामध्‍ये मंदिराचे जतन आणि दुरुस्‍ती करणे, दगडी सीमाभिंत बांधणे, जुन्‍या बांधकाम पृष्‍ठभागाची रासायनिक प्रक्रियेद्वारे स्‍वच्‍छता करणे, झाडे-झुडुपे काढणे, लोखंडी जाळ्‍या बसवणे, माहिती फलक आणि दिशादर्शक फलक बसवणे इत्‍यादी कामांसाठी हा निधी वापरण्‍यात येईल. यासाठी वने आणि सांस्‍कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला शब्‍द पूर्ण केला आहे. वचनपूर्ती केल्‍याविषयी भगवान महादेवाचे भक्‍तगण आणि परिसरातील जनतेच्‍या वतीने त्‍यांचे आभार व्‍यक्‍त करण्‍यात येत आहेत. मुनगंटीवार यांनी केलेल्‍या पाठपुराव्‍यामुळे सिद्धेश्‍वर मंदिराच्‍या जीर्णोद्धारासाठी १४ कोटी ९३ लक्ष रुपये निधी देण्‍यात आला होता.