आमदार सतीश चव्हाण आघाडीवर, तर मंत्री अतुल सावे पिछाडीवर !
छत्रपती संभाजीनगर – शासनाकडून प्रतिवर्षी प्राप्त होणार्या ५ कोटी रुपये आमदार निधीतून १ कोटी १५ लाख रुपये व्यय करत आमदार सतीश चव्हाण यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे, तर गृहनिर्माणमंत्री त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर पूर्वचे आमदार अतुल सावे यांनी अवघ्या १६ लाख ७५ सहस्र रुपयांचा निधी मतदारसंघात व्यय केला आहे. सर्व आमदारांना प्रत्येकी १ कोटी १५ लाख रुपयांचा निधी शासनाकडून संमत झालेला असतांनाही काही आमदारांनी निधी व्यय करण्यात हात आखडता घेतला आहे. (शासनाकडून लोकप्रतिनिधींना विकासकामे करण्यासाठी निधी उपलब्ध होत असतांना विकासकामांना गती पकडणे अपेक्षित आहे. अन्यथा निधी निरुपयोगी ठरेल. – संपादक)
जिल्ह्यात विधानसभेचे एकूण ९, तर विधान परिषदेचे ३ आमदार आहेत. प्रत्येक आमदाराला मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी वर्षाकाठी ५ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मिळतो. या निधीमधून आपापल्या मतदारसंघात रस्ते, जलनिःस्सारण, उद्याने, स्मशानभूमी, क्रीडांगणे आदी कामे करता येतात. जिल्हा नियोजन समितीकडे आमदार कामाची शिफारस करतात, त्यानंतर जिल्हा नियोजन समितीकडून प्रशासकीय मान्यता दिली जाते. त्या-त्या भागातील कार्यान्वयन यंत्रणा या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवते, अशी या निधी व्ययाची प्रक्रिया आहे.
मोठ्या पदांवरील लोकप्रतिनिधींचा व्यय अल्प !
जिल्ह्यात ३ मंत्री आणि १ विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. ३ मंत्र्यांपैकी संदिपान भुमरे वगळता अब्दुल सत्तार आणि अतुल सावे या दोघांचा निधी व्यय करण्यात सर्वांत शेवटचा क्रमांक आहे, तसेच दोन्ही मंत्र्यांसमवेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचाही निधी व्यय करण्यात शेवटून तिसरा क्रमांक लागतो.
सप्टेंबरअखेर कामे चालू होतील ! – अतुल सावे, आमदार तथा गृहनिर्माण मंत्री
मी माझ्या सर्व कामांची सूची सिद्ध केली आहे. ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळताच कामे चालू होतील. नेहमीप्रमाणे रस्ते आणि जलनिःस्सारण न करता काही वेगळे करण्याचा माझा प्रयत्न आहे. यात ‘बॅडमिंटन हॉल’ आणि सभागृह असे करण्याचे ठरवले आहे. यासाठी थोडा वेळ लागत आहे. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत कामे चालू होतील.