देवद येथील सनातनच्‍या आश्रमातील साधक श्री. यशवंत दौलतराव वसाने (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय ७५ वर्षे) यांचा जीवनप्रवास !

६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे श्री. यशवंत वसाने यांना निज श्रावण कृष्‍ण त्रयोदशी (१२.९.२०२३) या दिवशी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्‍यानिमित्त त्‍यांचा जीवनप्रवास येथे देत आहोत.

श्री. यशवंत वसाने

श्री. यशवंत वसाने यांना ७५ व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून नमस्‍कार !

१. साधनेत येण्‍यापूर्वीचे जीवन

१ अ. जन्‍म : ‘माझा जन्‍म १.९.१९४८ (श्रावण कृष्‍ण पक्ष त्रयोदशी) या दिवशी मु. एरंडोल, जिल्‍हा जळगाव (पूर्व खानदेश) येथे झाला.

१ आ. कौटुंबिक स्‍थिती : माझे वडील महाराष्‍ट्र शासनाच्‍या महसूल विभागात तलाठी या पदावर कार्यरत होते. त्‍यामुळे माझे सर्व बालपण आणि शिक्षण ग्रामीण भागात झाले. प्रत्‍येक ३ – ४ वर्षांत वडिलांचे स्‍थानांतर (बदली) होऊन त्‍यांना दुसर्‍या गावी जावे लागे. त्‍यात बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड या ४ तालुक्‍यांत त्‍यांचे स्‍थानांतर (बदल्‍या) होत असे. माझी शैक्षणिक क्षमता जेमतेम होती.

१ इ. कुटुंबातील धार्मिक वातावरण : माझे वडील वारकरी संप्रदायात होते. ह.भ.प. सोनोपंत दांडेकर त्‍यांचे गुरु होते. त्‍यामुळे आमच्‍या घरी नियमित धार्मिक ग्रंथांची पारायणे, भजने, हरिपाठ इत्‍यादी कार्यक्रम असत. त्‍यामुळे तसे संस्‍कार आमच्‍यावरही झाले. प्रतिदिन घरी हरिपाठ आणि पसायदान म्‍हटले जात असे. त्‍यामुळे घरातले वातावरणही सात्त्विक होते. आई-वडील देववेडे होते, तसेच ते शिस्‍तप्रिय आणि काटकसरीही होते. नोकरीच्‍या शेवटी वडिलांनी सासवड या गावी श्री संत सोपानकाका (संत ज्ञानेश्‍वर महाराजांचे लहान बंधू) यांच्‍या चरणी (त्‍यांच्‍या गावी) २ गुंठे जागा घेतली आणि आम्‍ही तेथे स्‍थायिक झालो. माझे वडील श्री सोपानकाकांच्‍या मंदिरात कीर्तनकार होते.

१ ई. माध्‍यमिक शिक्षण आणि नोकरी : वर्ष १९६७ मध्‍ये ११ वी पर्यंत शिक्षण झाल्‍यानंतर मी एक वर्ष आैंध, पुणे येथे तांत्रिक शिक्षणाचा एक अभ्‍यासक्रम (कोर्स) पूर्ण केला. वर्ष १९७०-७१ मध्‍ये पुण्‍यातील ‘बजाज ऑटो’ या आस्‍थापनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेमध्‍ये (आय.टी.आय. मध्‍ये) पहिल्‍या १० विद्यार्थ्‍यांना पुढील अभ्‍यासक्रमासाठी (कोर्ससाठी) त्‍यांच्‍या समवेत नेले. त्‍यात माझी निवड झाली होती. ‘बजाज ऑटो’ या आस्‍थापनात नोकरी करत मी केंद्र सरकारचा ‘एन्.सी.टी.यू.टी.’ हा अभ्‍यासक्रम (एक प्रकारचा टेक्निकल कोर्स) चांगल्‍या गुणांनी उत्तीर्ण केला आणि वर्ष १९७२ मध्‍ये मी तेथेच ‘कुशल कामगार’ म्‍हणून ‘देखभाल आणि दुरुस्‍ती’ विभागात कायमस्‍वरूपी रुजू झालो. अशा प्रकारे मी वर्ष १९७० ते १९७६ या काळात ‘बजाज ऑटो’ या आस्‍थापनात नोकरी केली. नंतर मी ‘बजाज ऑटो’मधील नोकरी सोडली आणि मी मुंबई येथे २६.२.१९७६ पासून ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’ च्‍या केंद्रीय कार्यालयात रुजू झालो. वर्ष १९७६ ते वर्ष १९८९ पर्यंत मी ठाणे येथे विटावा या गावात कुटुंबियांसमवेत राहिलो.

देवाच्‍या कृपेने वर्ष १९८९ पासून कार्यालयाच्‍या जवळ (मंडाळा गाव, अणूशक्‍तीनगर, मुंबई) असणार्‍या निवासी वसाहतीत मला सदनिका मिळाली आणि मी वर्ष २००८ च्‍या ऑगस्‍ट मासापर्यंत तेथे वास्‍तव्‍यास होतो.

१ उ. आध्‍यात्मिक स्‍थिती आणि स्‍वभावदोष : मला घरातून वारकरी संस्‍कार मिळालेले होते. मी नियमित हरिपाठ म्‍हणणे, ४ – ६ मासातून एकदा गुरुचरित्राचे पारायण करणे इत्‍यादी सर्व साधना मनानेच वैयक्‍तिक व्‍यावहारिक उन्‍नतीसाठी करत होतो. माझा स्‍वभाव पुष्‍कळ तापट, चिडखोर आणि अहंकारी होता, तसेच माझ्‍यात अनेक स्‍वभावदोष प्रबळ होते.

१ ऊ. आई-वडिलांच्‍या कृपेने अंगी बाणले गेलेले गुण : आई-वडिलांनी बिंबवलेले प्रामाणिकपणा, कामासाठी समयमर्यादा घालणे, काम परिपूर्ण करणे, व्‍यवस्‍थितपणा, स्‍वच्‍छता इत्‍यादी गुणही माझ्‍यात होते. त्‍यामुळे कार्यालयीन कामकाजात मी निपुण आणि आदर्श होतो. मी प्रत्‍येक कार्य करण्‍यापूर्वी दत्तगुरूंना प्रार्थना करूनच कार्य करायचो. ही आई-वडिलांची शिकवण नेहमी माझ्‍या समवेत असायची.

१ ए. साधनेत येण्‍यापूर्वी सूक्ष्मातून सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साहाय्‍य मिळत असल्‍याचे अनुभवणे : मला पैसे कमवण्‍याची हाव होती. पगाराव्‍यतिरिक्‍त बाहेर काम करून मी पैसे कमवायचो. हे सर्व करत असतांना मला ‘माझ्‍या पाठीशी कोणीतरी आहे आणि ते मला वेळोवेळी साहाय्‍य करत आहेत’, असे नेहमी जाणवायचे. ‘येणार्‍या संकटातून कोणीतरी मला अलगद बाहेर काढत असते’, याची मला सतत जाणीव होत असे. यावरून ‘माझे रक्षण प.पू. डॉ. आठवले (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) करत होते’, असे मला आता वाटते.’

(क्रमशः)

– श्री. यशवंत दौलतराव वसाने (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय ७५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (जुलै २०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक