हणजूण (गोवा) येथील वेश्याव्यवसायाच्या प्रकरणी हवालदाराचे स्थानांतर

सुरक्षेसाठी पैसे (प्रॉटेक्शन मनी) घेतल्याचा ठपका

पणजी, ९ सप्टेंबर (वार्ता.) – हणजूण येथील पोलिसांनी उघडकीस आणलेल्या आंतरराष्ट्रीय वेश्याव्यवसायाच्या ठिकाणाला पोलिसांचे संरक्षण दिल्याचा ठपका ठेवून हवालदार अनिल पिळगावकर याचे तडकाफडकी पणजी मुख्यालयात स्थानांतर करण्यात आले आहे. हवालदार अनिल पिळगावकर याचा हणजूण पोलीस ठाण्यात दबदबा आहे. वेश्याव्यवसायावर कारवाई करतांना कह्यात घेण्यात आलेल्या संशयितांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी हवालदार अनिल पिळगावकर याच्यावर कारवाई केलेली आहे. हवालदार अनिल पिळगावकर हा गेली १० वर्षे हणजूण पोलीस ठाण्यात कार्यरत होता. हवालदार अनिल पिळगावकर याचे आगशी आणि कोलवाळ या पोलीस ठाण्यांमध्ये स्थानांतर करण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आलेले होते; मात्र स्थानांतर झाले नाही. यामुळे ‘असे का घडले ?’ याचे सखोल अन्वेषण केल्यास मोठे पोलीस अधिकारी सापडू शकतील, अशा प्रतिक्रिया उमटत आहे.


चालू वर्षी १४ पोलिसांचे निलंबन !

यंदा जानेवारीपासून आतापर्यंत निरनिराळ्या कारणांसाठी १४ पोलीस कर्मचार्‍यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबित पोलिसांच्या सूचीत पोलीस शिपायांपासून पोलीस उपमहानिरीक्षक यांचा समावेश आहे. हत्यांच्या प्रकरणांतील सहभाग, लाच घेणे, वेळेत गुन्हा नोंद न करणे, वयस्कर जोडप्याची सतावणूक करणे, महिलांचा विनयभंग आदी कारणांमुळे पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे लोकांचा पोलिसांवरील विश्वास उडत आहे.

संपादकीय भूमिका

  • गोवा पोलिसांना झाले आहे तरी काय ? गुन्हेगारीतील सहभागाचे प्रकार चालूच !
  • गोवा पोलिसांचे गुन्हेगारांशी संबंध असणे, महिलांचा विनयभंग करणे, भ्रष्टाचारातील सहभाग आणि आता वेश्याव्यवसायाला साहाय्य करणे हे सर्व गुन्हेगारीतील वाढते प्रकार पहाता पोलीस खात्याचे शुद्धीकरण करणे आवश्यक बनले आहे !
  • मुख्यमंत्र्यांनी या गंभीर स्थितीची नोंद घेऊन त्वरित योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे !