सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी टाळ वाजवत नृत्य करण्याची सेवा करतांना आलेल्या अनुभूती !

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त प्रार्थना करून झोपणे

कु. श्रावणी पेठकर

‘२०.४.२०२३ या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी मी प.पू. डॉक्टरांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) आत्मनिवेदन करत माझ्याकडून झालेल्या चुका सांगत होते. त्यानंतर आपोआपच माझ्याकडून प्रार्थना झाली, ‘हे गुरुदेवा, पुढच्या मासामध्ये आपला जन्मोत्सव आहे. आपण अनंत आहात. परब्रह्म आहात. प्रतिदिनच आपला जन्मोत्सव आहे, तर तो अनुभवण्यासाठी मी पुढील मासातील त्या दिनांकाची वाट का बघू ? या क्षणापासूनच तुम्ही माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित अशी साधना करून घ्या. आतापासूनच जन्मोत्सवाचा काळ चालू झाला आहे. हा माझा भाव अखंड जागृत राहून तुम्हीच माझ्याकडून साधनेचेे प्रयत्न करून घ्या. आपली कृपा अनुभवण्यासाठी आपणच माझ्याकडून तळमळीने प्रयत्न करून घ्या, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’ अशी प्रार्थना करून मी झोपले.

२. स्वप्नात एका सुवर्णाच्या रथामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ बसले असून त्यांच्यापुढे साधक आनंदाने नाचत असल्याचे दिसणे

टाळ वाजवत नृत्य करतांना कु. श्रावणी पेठकर

त्यानंतर २१.४.२०२३ या दिवशी पहाटे मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये ‘प.पू. डॉक्टर एका सुवर्णाच्या रथामध्ये बसले आहेत. त्यांच्या बाजूला श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ नऊवारी साडी नेसून उभ्या होत्या. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताईंच्या साडीचा रंग हिरवा आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या साडीचा रंग पिवळा होता. जसे जगन्नाथ पुरी, तिरुपती बालाजी येथे देवाचा रथ ओढतात, त्याचप्रमाणे सर्व साधक रथ ओढत आहेत’, असे मला दिसले. काही साधक हातामध्ये विविध प्रकारची वाद्ये घेऊन ती वाजवत आनंदाने नाचत होते. माझ्या हातात टाळासारखे काहीतरी होते आणि मी त्या रथाच्या समोर नाचत असल्याचे मला दिसले. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून अश्रू येत होते. मला माझ्या अस्तित्वाची जाणीव नव्हती. ‘मी बेभान होऊन नाचत आहे आणि देवाला आळवत आहे. माझे पाय भूमीवर नसून हवेत आहेत’, असे मला वाटत होते. माझ्या डोळ्यांतून येणारे अश्रू थांबतच नव्हते. त्यांचा स्पर्श मला जाणवत होता. त्यामुळे मला जाग आली आणि मी माझ्या डोळ्यांना हात लावला, तर माझे डोळे ओले नव्हते. मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केल्यावर मला हेच दृश्य दिसले. माझ्या मनाची स्थिती तेव्हा पूर्णपणे शांत होती. सकाळी ६.३० वाजता उठल्यानंतर मी माझे स्वप्न सहसाधिकेला आनंदाने सांगितले. त्या वेळी मला असे वाटले, ‘या स्वप्नाच्या माध्यमातून गुरुदेवांनीच माझ्यातील भाव वाढवण्यासाठी मला शक्ती दिली आहे. ‘ते माझ्या समवेतच आहेत’, याची जाणीव त्यांनी मला पुन्हा करून दिली.’

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला स्वप्नामध्ये विविध रूपांत दर्शन देणे

त्यानंतर ७ दिवसांनी, म्हणजे २७.४.२०२३ या दिवशी मला पुन्हा एक स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये प.पू. डॉक्टर मला त्यांच्या वेगवेगळ्या रूपांचे दर्शन घडवत असल्याचे दिसले, तसेच ते माझ्या बाजूलाही होते. ते त्या प्रत्येक रूपाकडे हात दाखवून काहीतरी सांगत होते. प.पू. डॉक्टरांनी मला श्रीराम, श्रीकृष्ण, विष्णु, सत्यनारायण, दत्त अशा अनेक रूपांमधे दर्शन दिलेे. त्या वेळी माझे मन कृतज्ञतेने भरून आले होते. स्वप्नामध्ये प.पू. डॉक्टर मला काय सांगत आहेत, हे लक्षात येत होते; पण झोपेतून उठल्यानंतर मला त्यांचे बोलणे आठवत नव्हते.

४. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला इतरांप्रमाणे प्रत्यक्ष भेटण्याची आवश्यकता नाही’, असे सांगणे आणि तसेच घडणे

त्यानंतर सकाळी उठल्यावर ते स्वप्न पुन्हा आठवत असतांना गुरुदेवांच्या यापूर्वीच्या भेटीच्या वेळी त्यांनी मला सांगितलेले वाक्य आठवले. ते मला म्हणाले होते, ‘‘इतर जसे मला येऊन प्रत्यक्ष भेटतात, तशी तुला आणि मला भेटण्याची आवश्यकता नाही; कारण आपण प्रतिदिन एकमेकांना भेटत असतो.’’ त्या वेळी मला त्याचा अर्थ कळला नव्हता. या स्वप्नाच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा मला याची जाणीव करून दिली. तेव्हा मला असे लक्षात आले की, त्यांना अनुभवण्यासाठी त्यांच्या जवळ जाण्यासाठी एक पाऊल पुढे केले होते. ते पाऊल टाकण्यासाठीही त्यांच्याकडेच प्रार्थना केली. प.पू. डॉक्टरांनी तर मला अलगद उचलून त्यांच्या चरणांजवळच नेले. जेव्हा जेव्हा मी हे स्वप्न आठवते, तेव्हा तेव्हा माझे मन शांत होऊन मला थंडावा जाणवतो आणि आपोआपच डोळ्यांतून अश्रू येतात.

५. स्वप्नातील दृश्यात पूर्वसूचना मिळून त्यानुसार प्रत्यक्षात गुरुदेवांच्या समोर टाळ वाजवत नृत्य करण्याची सेवा मिळणे

या जन्मोत्सवाच्या वेळी गुरुदेवांचा दिव्य रथोत्सव करण्यात आला. तेव्हा मला दृश्य दिसल्याप्रमाणेच घडले आणि प्रत्यक्षात रथाच्या समोर टाळ वाजवत नृत्य करण्याची सेवा गुरुकृपेनेच लाभली. गुरुदेवांच्या समोर नृत्यसेवेच्या माध्यमातून दशावतार दाखवण्यात आले. तेव्हा मला पडलेले स्वप्न हे पूर्वसूचना असल्याचे लक्षात येऊन पुष्कळ कृतज्ञता वाटली.

६. श्रीमन्नारायणाच्या रथासमोर टाळ वाजवण्याची सेवा मिळाल्यावर कृतज्ञताभाव जागृत होणे

‘प.पू. डॉक्टर प्रत्येक साधकाला आनंद देण्यासाठी किती करतात ?’, असे वाटून माझा भाव जागृत झाला. माझी कोणतीही पात्रता नसतांना प्रत्यक्ष श्रीमन्नारायणाच्या रथासमोर टाळ वाजवण्याची सेवा मिळणे, म्हणजे त्यांनी माझ्यावर केलेली फार मोठी कृपाच आहे. ‘स्वप्नाच्या माध्यमातून मिळालेली टाळ सेवा मी कशी करायला हवी ?’, हे आधीच (स्वप्नातून) प.पू. डॉक्टरांनी मला शिकवले. मला या सोहळ्याचा लाभ आध्यात्मिक स्तरावर होऊन मला त्यातून आनंद मिळावा, यासाठी गुरुदेवांनी किती केले ! हे गुरुमाऊली, मी आपल्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.

७. देवाचा रथोत्सव बघण्याची आणि त्यामध्ये सहभागी होण्याची लहानपणापासूनची इच्छा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पूर्ण करणे

माझे कुलदैवत तिरुपती बालाजी आहे. मला लहानपणापासूनच देवाचा रथोत्सव बघण्याची आणि त्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा होती; पण तसा योग येत नव्हता. मी पूर्णवेळ साधना चालू केल्यावर माझ्या मनात रथोत्सवाचा विचार एक-दोन वेळा येऊन गेला. नंतर मी ते विसरून गेले. या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गुरुदेवांनी माझी ती सुप्त इच्छा पूर्ण केली. साक्षात् श्रीमन्नारायण स्वरूप प.पू. डॉक्टर रथात होते आणि त्या फेरीमध्ये त्यांनीच मला सहभागी करून घेतले. यावरून लक्षात येते की, साधकाच्या मनातील अगदी लहान विचार गुरुमाऊलीला कळतो. ज्या वेळी आवश्यक असते आणि त्यामुळे साधकाची साधना होऊन त्याच्यामध्ये भाववृद्धी होणार असते, ते श्री गुरु आपल्याला देतात. असे गुरुदेव मला लाभले आहेत.

हे प्राणप्रिय गुरुमाऊली, मी क्षणोक्षणी कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपूर्णच आहे. तुमचे आम्हा साधकांवर क्षीरसागराप्रमाणे अथांग प्रेम आहे. त्या प्रेमाने आम्हाला चिंबचिंब भिजवून आमचे प्रारब्ध नष्ट केले आहे. हे गुरुमाऊली, आम्ही केवळ आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– कु. श्रावणी पेठकर (वय २१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.५.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक