गोवा : भ्रष्टाचाराच्या आरोपावरून कुंकळ्ळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सेवेतून निलंबित !

पणजी, ८ सप्टेंबर (वार्ता.) – गोवा पोलिसांनी कुंकळ्ळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक तुकाराम चव्हाण यांना सेवेतून निलंबित केले आहे. ‘आप’चे नेते संदेश तळेकर यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस दलाने ही कारवाई केली आहे.

सध्या एक चलचित्र सामाजिक माध्यमांवर फिरत असून यामध्ये ‘आप’चे नेते संदेश तळेकर म्हणतात, ‘‘पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू आहे. एखाद्या पोलीस ठाण्यामध्ये पदावर कायम रहाण्यासाठी पोलीस अधिकार्‍यांना राजकीय नेत्याला (‘प्रॉटेक्शन’ मनी) लाच द्यावी लागते, अन्यथा त्याचे एका पोलीस ठाण्यातून दुसर्‍या पोलीस ठाण्यात स्थानांतर (बदली) करण्यात येते. पोलीस वाहतूक दलामध्ये आणि अधिक लाच दिली जाते, अशा पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्ती होऊन तेथे कायम रहाण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतात. यामुळे पोलीस दलात भ्रष्टाचार वाढत चालला आहे. याचा परिणाम म्हणून पोलीस दलाची प्रतिमा खालावत चालली आहे. राज्यात गुन्हेगारी वाढण्यास हेही एक कारण आहे. कुंकळ्ळी पोलीस ठाण्याचे निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी काब-द-राम येथील एका ‘शॅक’च्या (समुद्रकिनार्‍यावरील उपाहारगृह आणि मद्यविक्री केंद्र) मालकाकडून १० लाख रुपये लाच घेतली. ‘हे पैसे एका वरिष्ठ राजकारण्याला द्यायचे आहेत’, असे सांगून ही लाच घेण्यात आली. हे प्रकरण मी पुढे दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांकडे मांडले आणि यानंतर दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षकांनी पोलीस निरीक्षक चव्हाण यांना त्यांनी घेतलेले पैसे ‘शॅक’च्या मालकाला परत देण्यास सांगितले. संबंधित ‘शॅक’च्या मालकाचे अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने यासंबंधी पुढील कारवाई करता आली नाही.’’

पोलीस उपमहानिरीक्षक (रेंज) अस्लम खान (आय.पी.एस्.) यांनी पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांचा निलंबनाचा आदेश काढला आहे. प्राप्त माहितीनुसार पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण हे वर्ष २०२० मध्ये काणकोण पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून सेवेला होते आणि त्या वेळी त्यांनी ‘आप’चे नेता संदेश तळेकर यांच्या विरोधात एका गुन्ह्यावरून कारवाई केली होती.

संपादकीय भूमिका

  • गोवा पोलिसांना झाले आहे तरी काय ? गुन्हेगारीतील सहभागाचे प्रकार चालूच !
  • गोवा पोलिसांचे गुन्हेगारांशी संबंध असणे, महिलांचा विनयभंग करणे आणि आता भ्रष्टाचारातील सहभाग हे सर्व गुन्हेगारीतील वाढते प्रकार पहाता पोलीस खात्याचे शुद्धीकरण करणे आवश्यक बनले आहे !
  • मुख्यमंत्र्यांनी या गंभीर स्थितीची नोंद घेऊन त्वरित योग्य ती कारवाई करावी, ही अपेक्षा !