खंडाळा (सातारा) येथील ‘रियटर इंडिया’ आस्‍थापनाविरोधात ३५० कर्मचारी रस्‍त्‍यावर !

‘रियटर इंडिया’ या आस्‍थापनाला विविध मागण्‍यांची पूर्तता करण्‍यासाठी कामगार संघटनेचे आंदोलन

सातारा, ७ सप्‍टेंबर (वार्ता.) – खंडाळा तालुक्‍यातील ‘रियटर इंडिया’ या आस्‍थापनाला विविध मागण्‍यांची पूर्तता करण्‍यासाठी कामगार संघटनेने संपाचे पत्र दिले आहे. आस्‍थापनाविरोधात ३५० हून अधिक कर्मचारी रस्‍त्‍यावर उतरले आहेत. ६ सप्‍टेंबर या दिवशी कर्मचार्‍यांनी आक्रमक होत जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या प्रवेशद्वारावर ठिय्‍या आंदोलन करत जिल्‍हाधिकारी आणि जिल्‍हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले. या आंदोलनाचा हा ४३ वा दिवस होता.

निवेदनामध्‍ये म्‍हटले आहे, आस्‍थापनातील १२ कर्मचार्‍यांवर खोटे आरोप करत त्‍यांना चौकशीच्‍या नावाखाली निलंबित केले आहे, तसेच १० कर्मचार्‍यांवर विविध आरोप करत त्‍यांच्‍यामागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे. जिल्‍ह्यातील २० कर्मचार्‍यांचे प्रशिक्षणाच्‍या नावाखाली चंडीगड आणि कोइमतूर येथे स्‍थानांतर केले आहे. आस्‍थापन व्‍यवस्‍थापनाने घेतलेले हे सर्व निर्णय रहित करून पुन्‍हा कर्मचार्‍यांना सेवेस सामावून घ्‍यावे, तसेच स्‍थानांतर केलेल्‍या कर्मचार्‍यांना पुन्‍हा खंडाळा येथे सेवेत रुजू करून घ्‍यावे. कर्मचार्‍यांना कामाच्‍या ठिकाणी दिली जाणारी अन्‍यायकारक वागणूक थांबवावी. (४३ दिवस होऊनही सनदशीर मार्गाने आंदोलन करत असलेल्‍या कामगारांची नोंद कुणीही घेण्‍यास सिद्ध नाही. कामगार मंत्र्यांनी याविषयी लक्ष घालून योग्‍य तो तोडगा काढावा, अशी कर्मचार्‍यांची अपेक्षा आहे ! – संपादक)

‘रियटर इंडिया’ आस्‍थापनाच्‍या विरोधातील आरोप तथ्‍यहीन ! – व्‍यवस्‍थापन विभाग

‘रियटर इंडिया’ हे आस्‍थापन कर्मचार्‍यांना प्रगती करण्‍यासाठी असंख्‍य संधी देत आहे. कामगारांना विविध सुविधा आणि लाभ पुरवत आहोत. शेकडो कर्मचार्‍यांनी सरकारला पत्र पाठवून आस्‍थापनाला भक्‍कम पाठिंबा दर्शवला आहे. आस्‍थापनाच्‍या विरोधातील लोकांनी कर्मचार्‍यांची दिशाभूल केली आहे, असा खुलासा आस्‍थापनेच्‍या व्‍यवस्‍थापन विभागाने केला आहे.