जळगाव येथे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा २५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा !
जळगाव – प्रत्येक व्यक्ती हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने आपापल्या परीने कार्य करत असते; पण त्या सर्वांना योग्य दिशा देण्याचे काम ‘सनातन प्रभात’ नियतकालिक करत आहे. ‘सनातन प्रभात’ हे आपल्या घरी येणारे केवळ नियतकालिक नाही, तर एक धर्मग्रंथ आहे. ‘सनातन प्रभात’मध्ये येणारे प्रत्येक वृत्त हे सत्य, शाश्वत आणि सनातन (म्हणजे नित्यनूतन) असते. ‘सनातन प्रभात’मधून ज्ञान तर मिळतेच; मात्र त्याही पुढे जाऊन येणार्या आपत्काळाची सिद्धता कशी करावी ? याविषयीही माहिती मिळते. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत असणारे ‘सनातन प्रभात’ हे जगातील एकमेव नियतकालिक आहे, असे मार्गदर्शन भागवतकार देवदत्त मोरदे महाराज यांनी केले. ते येथे झालेल्या साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या २५ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक श्री. प्रशांत जुवेकर, ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. नीलेश पाटील उपस्थित होते.
या वेळी श्री. प्रशांत जुवेकर म्हणाले, ‘‘कितीही प्रतिकूलता असली, तरी तत्त्वांशी कोणतीही तडजोड न करता, निर्भिडपणे हिंदुत्वाची वृत्ते प्रसिद्ध करणारे ‘सनातन प्रभात’ हे योद्धा वृत्तपत्र आहे. ‘सनातन प्रभात’मुळे हिंदुत्वाच्या कार्याला वैचारिक बळ प्राप्त होत असून अनेक हिंदुत्वनिष्ठांसाठी ते हक्काचे व्यासपीठ बनले आहे. हिंदु राष्ट्राचे ध्येय केवळ एक स्वप्न नसून ती ‘श्रीं’ची इच्छा आहे अन् ते साकार होणारच आहे. ही श्रद्धा ‘सनातन प्रभात’ने निर्माण केली आहे.
श्री. नीलेश पाटील यांनी ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांच्या विस्ताराविषयी माहिती दिली. या सोहळ्याला १५०हून अधिक वाचक, वितरक, विज्ञापनदाते, हितचिंतक आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.