रस्त्यांवरील खड्ड्यांची तक्रार थेट सरकारकडे करण्यासाठी लवकरच ‘अ‍ॅप’ कार्यरत होणार !


मुंबई, ६ सप्टेंबर (वार्ता.) – यापुढे राज्य आणि प्रमुख जिल्हा मार्गांवरील खड्ड्यांची तक्रार थेट सरकारकडे करता येणार आहे. तक्रार करण्यासाठी राज्य सरकारने ‘अ‍ॅप’ बनवण्याचा निर्णय घेतला असून यासाठी ६ सप्टेंबर या दिवशी एक समिती स्थापन केली आहे.


राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हामार्ग बनवणे, तसेच त्यांची दुरुस्ती आणि देखभाल करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे केले जाते. यामध्ये रस्त्यांवरील खड्डे भरणे आणि रस्त्यांची दुरुस्ती ही कामे त्वरित करावयाची असतात; मात्र ही कामे तत्परतेने केली जात नाहीत. अशी कोणती कामे रखडल्यास किंवा दर्जाहीन झाल्यास नागरिकांना थेट सरकारकडे तक्रार करता यावी, यासाठी हे ‘अ‍ॅप’ बनवले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते) सचिव या समितीचे अध्यक्ष आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (बांधकामे) सचिव आणि कोकण विभागाचे मुख्य अभियंता हे या समितीचे सदस्य आहेत. २ आठवड्यांमध्ये ही समिती सरकारला याविषयीचा अहवाल सादर करणार आहे.