१५ लाखांची खंडणी मागणार्‍या पुणे येथील पोलीस कर्मचार्‍यावर गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – दौंड तालुक्यातील वरवंड येथील सुरेश गांधी या ज्येष्ठ नागरिकाचा विभागाच्या परिसरात गळा दाबून हत्या करतांनाचा ‘व्हिडिओ’ आपल्याकडे आहे. हे प्रकरण कुणाला न सांगण्यासाठी मला १५ लाख रुपये द्या, अशी मागणी करणार्‍या पोलिसावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सागर शिंदे असे गुन्हा नोंद करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव असून शिंदे हा विश्रामबाग पोलीस ठाण्यातील कर्मचारी आहे. शिंदे मागील ६ मासांपासून अनुपस्थित आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर शिंदे याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता; मात्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळून लावला आहे.

२७ मार्च २०२२ या दिवशी वरवंड येथील राहुल भंडारी यांचे सासरे सुरेश गांधी यांची गळा आवळून वन विभागाच्या जागेत हत्या करण्यात आली होती. ‘ही हत्या करतांनाचा ‘व्हिडिओ’ माझ्याकडे असून या प्रकरणात तुमच्या घरातील सर्वांना अडकवू शकतो’, असे सांगत सागर शिंदे याने १५ लाखांची मागणी राकेश भंडारी यांच्याकडे केली होती. सागर शिंदे याने आरोपी राकेश भंडारी यांच्याकडून यापूर्वी ८ लाख रुपये घेतले आहेत. त्यामुळे राकेश भंडारी यांनी यवत पोलीस ठाण्यात सागर शिंदे याच्या विरोधात तक्रार दिली. या तक्रारीवरून यवत पोलिसांनी सागर शिंदे याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका

पोलिसांनी खंडणीखोर असणे म्हणजे स्वतःच कायदा – सुव्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगल्यासारखे आहे !

पोलिसांचेच वर्तन असे असेल, तर कुणी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाईल का ? स्वतः लाच घेणारे पोलीस समाजात होणारी लाचखोरी आणि लूट कशी रोखणार ?