लोकसभेच्या विशेष अधिवेशनात ‘एक देश-एक निवडणूक’ हे विधेयक आल्यास त्याचा सर्वांनाच लाभ ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप

खासदार धनंजय महाडिक

कोल्हापूर, ३ सप्टेंबर (वार्ता.) – १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत लोकसभेचे विशेष अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात ‘एक देश-एक निवडणूक’ हे विधेयक येणार असल्याची चर्चा आहे. या विधेयकाचे मी स्वागत करतो आणि हे विधेयक आल्यास त्याचा सर्वांनाच लाभ होणार आहे. शासकीय यंत्रणांवर अनेक निवडणुकांचा जो ताण असतो, तो अल्प होणार साहाय्य होणार आहे, असे मत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

१. दूध उत्पादक संघ ‘गोकुळ’च्या लेखा परीक्षणातील त्रुटीच्या संदर्भात संचालक सौ. शौमिका महाडिक यांनी उपस्थित केलेली सर्व सूत्रे योग्यच आहेत. या संदर्भात सत्ताधार्‍यांनी उच्च न्यायालयात प्रविष्ट केलेली याचिका फेटाळण्यात आली असून या संदर्भात आता पुढील कारवाई होणारच आहे. गोकुळच्या निवडणुकीत सत्ताधार्‍यांनी जी आश्वासने दिली, त्यातील एकही पाळले नसून गोकुळचे दूधसंकलन घटले आहे, दूध उत्पादक शेतकर्‍यांना कोणतीही दरवाढ नाही, अशी स्थिती आहे. दूधसंकलन घटल्याने सदस्य असलेल्या शेतकर्‍यांना म्हैस घेण्यासाठी बळजोरी केली जात आहे. त्यामुळे या विरोधात शेतकर्‍यांमध्ये प्रचंड रोष आहे.

२. मराठा आरक्षणाच्या संदर्भात ‘जालना’ येथे झालेली घटना दुर्दैवी असून या संदर्भातील चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातून सत्य समोर येईल.

३. ‘भारत जोडो अभियाना’चा टप्पा क्रमांक २ चालू होत असून ही यात्रा मुळात कशासाठी ? हाच प्रश्न आहे. जो भारत जोडलेलाच आहे, त्याला काँग्रेस आणखी काय जोडणार आहे ?