जालना – जिल्ह्यातील अंतरवाली तालुक्यातील सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणार्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे पडसाद दुसर्या दिवशीही राज्यभरात उमटले. राज्यभरात ठिकठिकाणी मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून ‘रस्ता बंद’, निदर्शने, ‘जोडे मारा’ आदी आंदोलने केली. ४ सप्टेंबरला ‘छत्रपती संभाजीनगर बंद’चे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन !
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुंबईत दादर प्लाझा येथे ३ सप्टेंबर या दिवशी सकाळी निषेध आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध केला. या वेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आंदोलकांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या त्यागपत्राची मागणी करण्यात आली.
सातारा जिल्ह्यात निदर्शने आणि ‘रस्ता बंद’ आंदोलन !
सातारा येथील पोवई नाक्यावर निदर्शने करण्यात आली. कराड येेथे मराठा मोर्चाच्या वतीने ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले. पाटण येथील लायब्ररी चौक येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ‘निषेध आंदोलन’ करण्यात आले. फलटण येथील डेक्कन चौक येथे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक माउली सावंत यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती बांधून सरकारचा निषेध करण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यात दुसर्या दिवशीही निदर्शने !
कोल्हापूरमध्ये ३ सप्टेंबरला सायंकाळी श्री मारुति मंदिरात मशाल पेटवून विरोध करण्याचा निर्धार करण्यात आला. राधानगरी येथे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वात गगनबावडा तालुका काँग्रेसच्या वतीने ‘निषेध सभा’ घेण्यात आली. हुपरी येथील बसस्थानक चौक येथे मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलेे. कार्यकर्त्यांनी दंडाला काळ्या फिती बांधून सरकारविरोधात घोषणा दिल्या.
सोलापूर येथे ‘जोडे मारा’ आंदोलन, महामार्ग रोखला !
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन दोषींवर कारवाई न झाल्यास ‘सोलापूर बंद’ची चेतावणी देण्यात आली. सोलापूर शहरासह बार्शी, मोहोळ, करमाळा तालुक्यांत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळण्यात आले. राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी येथे दुपारी संभाजी ब्रिगेडच्या वतीने ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. करमाळा येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून ६ सप्टेंबर या दिवशी मोर्चा काढण्यात येणार आहे. केम येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फलक जाळण्यात आले. बार्शी येथील पांडे चौक येथे ‘रस्ता बंद’ आंदोलन करण्यात आले. माढा येथील मुख्य चौक येथे मराठा समाजाच्या वतीने टायर पेटवून सरकारविरोधात ‘बोंबाबोंब आंदोलन’ करण्यात आले.
अहिल्यानगर येथे सरकारविरोधात निदर्शने !
अहिल्यानगर येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढून जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. संभाजी ब्रिगेडच्या वतीने ४ सप्टेंबर या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे, तर मराठा महासंघाने जिह्यातील अकोले, कर्जत आणि जामखेड येथे आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन दिले. जिल्ह्यातील ६०० बस बंद आहेत.
#HamaraBharat | मराठा आरक्षण को लेकर महाराष्ट्र के कई ज़िलों में प्रदर्शन, जालना में लाठीचार्ज से बवाल@deosikta pic.twitter.com/mgeUe1Y8A3
— NDTV India (@ndtvindia) September 3, 2023
१९ बसगाड्यांची जाळपोळ : बससेवा ठप्प झाल्यामुळे लाखो प्रवाशांचे हाल !
गेल्या २ दिवसांत राज्यात एकूण १९ एस्.टी. बसगाड्यांची जाळपोळ आणि तोडफोड करण्यात आली आहे. या आदोलनांमुळे अनेक आगारांमधील एस्.टीं.ची वाहतूक थांबवण्यात आली आहे. परिणामी लाख प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. याचा अपलाभ उठवत खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून अधिक भाडे आकारून प्रवाशांची लूट केली जात आहे. (सरकाने अशांवर कठोर कारवाई केली पाहिजे ! – संपादक)
जालना येथील घटनेची झळ मराठवाड्यातील जिल्ह्यांना बसली असून अनेक बस मधल्या स्थानकावर पोहचल्यानंतर रहित करण्यात आल्या. त्यामुळे नागपूरहून निघालेले अनेक प्रवासी मध्येच अडकले.
जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर !या घटनेच्या प्रकरणी जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना राज्याच्या गृहमंत्रालयाकडून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. |