पणजी (गोवा) येथील ‘गोवा म्युझिक कॉलेज’मध्ये पार पडले महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे व्याख्यान !

व्याख्यानाचा विषय होता ‘संगीताकडे आध्यात्मिक दृष्टीने पहाण्याचा दृष्टीकोन’ !

पणजी (गोवा) – येथील ‘गोवा म्युझिक कॉलेज’मध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचे ‘संगीताकडे आध्यात्मिक दृष्टीने पहाण्याचा दृष्टीकोन’ या विषयावर २६ ऑगस्ट या दिवशी व्याख्यान पार पडले. या कार्यक्रमाला महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचा लाभ महाविद्यालयाचे १०० विद्यार्थी आणि गुरुजन यांनी घेतला. ‘हा कार्यक्रम पुष्कळ चांगला झाला’, असा अभिप्राय उपस्थित गुरुजनांनी दिला.

सुश्री (कु.) तेजल पात्रीकर

१. कार्यक्रमाच्या प्रारंभी ‘गोवा म्युझिक कॉलेज’चे ‘गायन आणि हार्मोनियम विभागा’चे प्रमुख श्री. प्रकाश देसाई यांनी सुश्री (कु.) तेजल पात्रीकर अन् सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर महाविद्यालयाचे तबला साहाय्यक प्रा. रुद्राक्ष वझे यांनी सुश्री (कु.) तेजल पात्रीकर आणि सद्गुरु डॉ. गाडगीळ यांची उपस्थितांना ओळख करून दिली.

२. या वेळी सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांनी सांगितले, ‘‘संगीताची उत्पत्ती ही ईश्‍वर आराधनेसाठी झाली असून हा उद्देश ठेवून कला शिकण्याचा दृष्टीकोन विद्यार्थ्यांनी ठेवायला हवा. ज्यामुळे विद्यार्थी कलेमध्ये असलेली स्वरांची शक्ती अनुभवू शकतो.’’ हे सूत्र सुश्री (कु.) तेजल यांनी उपस्थितांना सोदाहरण स्पष्ट केले.

३. यासह ‘भारतीय कलांमध्ये मूलत: असलेला सत्त्वगुण, सकारात्मकता हे विविध शास्त्रीय उपकरणांच्या आधारेही संशोधनाअंती स्पष्ट होते’, असेही सुश्री (कु.) तेजल यांनी सांगितले. याप्रसंगी काही संशोधनात्मक प्रयोगही दाखवण्यात आले.

४. व्याख्यानाच्या शेवटी सुश्री (कु.) तेजल यांनी उपस्थितांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या गोव्यातील संशोधन केंद्राला भेट देण्याविषयी आवाहन केले. त्याला श्री. प्रकाश देसाई यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

गुरुजनांचे अभिप्राय

१. श्री. प्रकाश देसाई, विभागप्रमुख, गायन आणि हार्मोनियम विभाग, गोवा म्युझिक कॉलेज : कु. तेजल पात्रीकर यांनी मांडलेला विषय आजच्या पिढीसाठी पुष्कळ आवश्यक आहे. आज आपण सनातन धर्माची वृत्ती सोडून कुठेतरी भरकटत चाललो आहोत. या वृत्तीकडे आम्ही पुन्हा येणे आवश्यक आहे. आजच्या पिढीने ‘मला संगीत हे पैसे केवळ कमवण्यासाठी शिकायचे आहे  ? कि आध्यात्मिक दृष्टीने, म्हणजे स्वत:च्या अंतर्मनासाठी शिकायचे आहे ? ही दिशा घेणे अतिशय आवश्यक आहे’, असे मला वाटते.

२. श्री. राया कोरगावकर, हार्मोनियम व्याख्याता, गोवा म्युझिक कॉलेज : आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला बरेच ज्ञान मिळाले. संगीत आणि अध्यात्म हे दोन्ही विषय जवळीक साधणारे आहेत. अध्यात्माविना संगीत, म्हणजे ‘जणु देवाला नमस्कार करतांना एक हातच आहे’, असे मला वाटते. देवाला नमस्कार करतांना आपण जसे दोन्ही हात एकत्रित करतो, त्याप्रमाणे अध्यात्म आणि संगीत हे डावा-उजवा हात आहेत. हे दोन्ही जर एकमेकांचा हात धरून चालले, तर हा परमेश्‍वराकडे जाण्याचा जवळचा मार्गच आहे’, असे मला वाटते.

३. डॉ. सुधांशू कुलकर्णी, हार्मोनियम सहप्राध्यापक, गोवा म्युझिक कॉलेज : कु. तेजल पात्रीकर यांनी मांडलेला विषय अभ्यासपूर्ण वाटला. त्यांनी विषयाच्या माध्यमातून दिलेली विविध उदाहरणे आम्हाला दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील. ‘संगीत हे केवळ मनोरंजनासाठी नसून ते आत्मरंजन, म्हणजेच परमेश्‍वर प्राप्तीसाठीच आहे’, याची आम्हाला प्रचीतीही आली. आम्हाला महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या संशोधन केंद्राला भेट देऊन या कार्यात सहभागी व्हायला आवडेल.

४. डॉ. (सौ.) गौरी नायक-भट, गायन सहप्राध्यापक, गोवा म्युझिक कॉलेज : आम्ही विद्यार्थ्यांना संगीत शिकवतांना त्यातील तात्त्विक भाग, उदा. रागाचे वादी आणि संवादी स्वर इत्यादी सांगतो. आम्ही हा सगळा भाग शिकवून कलाकार निर्मिती करतो. लोकांसमोर संगीत कसे सादर करायचे, ते शिकवतो. त्याच गाण्याची दुसरी बाजू, म्हणजेच अध्यात्माची दिशा आम्ही त्यांना कधीच देत नाही. भजनामध्ये आध्यात्मिकता असते; परंतु शास्त्रीय संगीतातही आध्यात्मिकता कशा प्रकारे आणायची, याची दिशा आजच्या व्याख्यानामुळे मिळाली. आम्ही शास्त्रीय संगीतात आध्यात्मिकता आणली, तर त्या संगीताचा लोक आणि वातावरण यांच्यावर पडणारा प्रभाव पुष्कळ अधिक असेल. रागातील प्रत्येक स्वराची अनुभूती घेऊन आम्ही ते मुलांना शिकवले, तर शास्त्रीय संगीतामध्ये पुष्कळ भेद जाणवेल. असे संगीत प्रगतशील होण्याच्या दृष्टीने पुष्कळ वरच्या स्तराचे असेल आणि यामुळे एका दैवी संगीताचे विश्‍व आम्ही निर्माण करू शकू, असे मला वाटते. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या या कार्यक्रमामुळे आम्हाला वेगळी दिशा मिळाली, त्यासाठी आम्ही आभारी आहोत. आम्हीही असे प्रयत्न नक्की करू.