भारताचे ‘चंद्रयान-३’चे यश अनुभवण्याचा क्षण हा प्रत्येक भारतियासाठी आनंदाचा आणि गौरवाचा क्षण होता. प्रत्येक भारतियाला या यशामुळे एवढा आनंद झाला, तर ज्या शास्त्रज्ञांनी ही मोहीम राबवली, त्यांना किती आनंद झाला असेल ? गेली ४ वर्षे रात्रंदिवस या सर्व शास्त्रज्ञांना एकच विचार, एकच ध्येय, एकच तळमळ आणि एकच ध्यास होता, तो म्हणजे ‘चंद्रयान-३’ मोहीम यशस्वीपणे राबवणे. ही मोहीम राबवण्यापूर्वी ‘इस्रो’चे प्रमुख श्री. सोमनाथ यांनी ‘चंद्रयान-३’ मोहिमेच्या यशासाठी तिरुपतीच्या मंदिरात जाऊन प्रार्थना केली, हे खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आणि अनुकरणीय आहे. यातून ‘वैज्ञानिकही धर्माचे अधिष्ठान ठेवतात’, हे लक्षात येते. यातून ते जपत असलेली भारतीय परंपरा आणि संस्कृती दिसून येते, तसेच ते वैज्ञानिक असूनही त्यांनी विज्ञानाच्या मर्यादा ओळखल्यामुळे त्यांची असलेली देवावरची श्रद्धा दिसून येते.
वर्ष २०१९ मध्ये ‘चंद्रयान-२’च्या अपयशानंतर खचून न जाता त्यामधील चुका पुन्हा न होण्यासाठी मेहनत घेऊन त्या चुकांमधून शिकण्याचा भाग आपल्या शास्त्रज्ञांनी केला. याउलट भारताकडून विश्वविक्रम होऊ नये, म्हणून एका देशाने त्यांचे यान पाठवण्यासाठी पुष्कळ घाई करून अल्प कालावधीत ते चंद्रावर पोचण्यासाठी अधिक पैसे खर्च करून राबवलेली मोहीम अपयशी ठरली. अयोग्य विचारामुळे झालेली, अयोग्य कृती आणि त्यामुळे झालेले परिणाम सर्वांनीच पाहिले. ते अपयश स्वीकारता न आल्याने त्यांचे शास्त्रज्ञ मनाने खचले आणि त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती व्हावे लागले.
‘चंद्रयान-३’मोहिमेच्या पाठीमागे असलेले ईश्वरी अधिष्ठान, शास्त्रज्ञांनी अपयशानंतर खचून न जाता त्यामधून शिकून त्यावर केलेली मात. ‘इस्रो’च्या प्रमुखांनी मंदिरात जाऊन प्रार्थना केलीच; पण त्यासमवेत अनेक ठिकाणी समाजातून सामूहिक प्रार्थनाही करण्यात आल्या. शास्त्रज्ञांची मेहनत, तीव्र इच्छाशक्ती होतीच; पण समवेत सर्व भारतियांच्या सदिच्छाही होत्याच. या सर्वांचा एकत्रित परिणाम सर्व जगाने पाहिला आणि भारताने विश्वविक्रम केला. यामधून ईश्वरी अधिष्ठान, शिकण्याची वृत्ती आणि कठोर परिश्रम असतील, तर ईश्वर त्याचे कार्य यशस्वी करतोच, हेच यामधून शिकता आले. प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनातही हेच सूत्र लागू होते. ज्या राष्ट्राचे नागरिक धर्माचे अधिष्ठान ठेवणारे आणि कठोर परिश्रम करणारे असतील, त्या राष्ट्राच्या यशोगाथा वृद्धींगतच होत जातात !
– सौ. समिधा पालशेतकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.