‘संस्कारपूर्ण आणि संस्कारमय जीवन जगण्याची देशकाल विशिष्ट रित (जीवनपद्धती आणि जीवनमूल्ये) म्हणजे संस्कृती’, ही डॉ. इरावती कर्वे यांनी दिलेली संस्कृती या शब्दाची व्याख्या. धर्मासह समग्र अंतर्बाह्य जीवनाच्या उन्नत अवस्थेसाठी ‘संस्कृती’ हा शब्द वापरला जातो. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसर्गात होणारा विकार आणि संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार होऊ नये, यासाठी त्यावर करायचा संस्कार. भारतीय संस्कृती ही देशाचा इतिहास, विलक्षण भूगोल आणि जनतेमधील वैविध्यता यांमुळे आकारास आली आहे. आपली भारतीय संस्कृती ही उच्चतम समृद्ध आहे. आजकाल आधुनिकतेच्या नावाखाली मात्र अनेक जण ‘फॅशन’ म्हणून फाटके, ठिगळ लावलेले कपडे परिधान करतात. भारतीय संस्कृतीमध्ये फाटके कपडे परिधान करणे म्हणजे दारिद्य्राचे लक्षण सांगितले आहे.
‘कोका कोला’, ‘थम्स अप’ यांसारख्या शीतपेयांमध्ये मानवी शरिराला हानीकारक घटक असतात. त्यामध्ये हानीकारक ‘अॅसिडिक’ घटक असतात. त्यांचे सेवन करणे मात्र आधुनिक जगात प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते. आजकाल आधुनिक भारतीय वाढदिवस रात्री १२ वाजता साजरा करतात. भारतीय संस्कृतीमध्ये सकाळ, सूर्योदय हा ‘शुभकाळ’, तर रात्री १२ ते ३ ही वेळ पिशाच्च्यांची समजली जाते. या उदाहरणांसह केस व्यवस्थित विंचरण्याऐवजी केस विंचरण्याच्या नावाखाली अस्ताव्यस्त केशरचना करणे अशी संस्कृतीच्या र्हासाची अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील.
यातून तेजोपासक असणारा भारतीय समाज आधुनिकीकरणाच्या नावाखाली तिमिरोपासनेकडे झुकत आहे कि काय ? हा प्रश्न प्रत्येक भारतियाने स्वतःला विचारण्याची वेळ आता आली आहे. भोगविलासात अडकलेल्या पाश्चात्त्य संस्कृतीमधील थिटेपणा लक्षात आल्यामुळे अनेक पाश्चात्त्य भारतीय संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत. या उलट भारतीय मात्र स्वत:च्या महान संस्कृतीला लाथाडत आहेत. हा कर्मद्ररिद्रीपणा होय. आधुनिकतेचा अंगीकार अवश्य करायला हवा; मात्र त्यासह भारतीय संस्कृतीमधील संस्कारांची सांगड घालायला हवी. स्वत: संस्कृतीचे पालन करून आपल्या भावी पिढीला तिचे महत्त्व वेळीच सांगायला हवे. कुणीतरी बाहेरून येईल आणि भारतीय संस्कृतीची मूल्ये जपेल, अशा भ्रमात न रहाता भारतियांनी जागृत होऊन ही मूल्ये जपायला हवीत.
– सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर, गोवा