गुरुपौर्णिमा महोत्‍सवासाठी सभागृह लवकर उपलब्‍ध होण्‍याच्‍या संदर्भात अनुभवलेली गुुरुकृपा !

श्री. श्रीराम खेडेकर

१. गुरुपौर्णिमेच्‍या आदल्‍या दिवशी सभागृह लवकर मिळण्‍यास अडचण येणे : ‘वर्ष २०२३ च्‍या गुरुपौर्णिमा महोत्‍सवासाठी पैसे भरून सभागृह आरक्षित केले होते. आम्‍ही सभागृहाच्‍या मालकांना सांगितले, ‘‘सभागृहाची सजावट करण्‍यासाठी गुरुपौर्णिमेच्‍या आदल्‍या दिवशी सभागृह हवे आहे.’’ गुरुपौर्णिमेच्‍या ३ दिवस आधी मी सभागृहाविषयी विचारणा करायला गेल्‍यावर मला समजले, ‘गुरुपौर्णिमेच्‍या आदल्‍या दिवशी सभागृहात वाढदिवसाचा कार्यक्रम दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत आहे. आम्‍हाला रात्री १० वाजल्‍यानंतर सभागृह मिळेल.’ त्‍यानुसार आम्‍ही साधकांच्‍या सेवेचे नियोजन केले.

२. गुरुपौर्णिमा महोत्‍सवाच्‍या आदल्‍या दिवशी सभागृहात असलेला कार्यक्रम दुपारीच पार पडणे आणि त्‍यामुळे साधकांना सभागृह लवकर उपलब्‍ध होणे : गुरुपौर्णिमेच्‍या आदल्‍या दिवशी आम्‍ही सहजच सभागृहाच्‍या ठिकाणी गेलो. तेव्‍हा सभागृहाच्‍या कार्यालयातील कर्मचार्‍यांनी आम्‍हाला सांगितले, ‘‘कार्यक्रम संध्‍याकाळच्‍या ऐवजी दुपारीच पार पडला आणि सभागृह संध्‍याकाळी ६ वाजता रिकामे झाले.’’

३. गुरुपौर्णिमा महोत्‍सवाच्‍या आदल्‍या दिवशी साधकांना सभागृहातील मुख्‍य सेवा करता येणे : त्‍यानुसार मी साधकांना निरोप दिला आणि रात्री ८ वाजता साधक सेवेसाठी सभागृहात पोचले. यामुळे मुख्‍य सेवा रात्री १२ वाजेपर्यंत पूर्ण झाल्‍या आणि अन्‍य सेवा गुरुपौर्णिमेच्‍या दिवशी सकाळी पूर्ण झाल्‍या. त्‍यामुळे गुरुपूजन आणि कार्यक्रम सहजतेने (अडचणीविना) पार पडला.

गुरुकृपेमुळे आदल्‍या दिवशीचा कार्यक्रम आयोजकांना संध्‍याकाळच्‍या ऐवजी दुपारी करण्‍याची बुद्धी झाली. साधकांना सेवा करण्‍याचा आनंद मिळाला आणि गुरुकृपा अनुभवता आली.’

– श्री. श्रीराम खेडेकर, नागेशी, फोंडा, गोवा. (३.७.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक