ठाणे, २५ ऑगस्ट (वार्ता.) – कथ्थक नृत्य क्षेत्रामधील प्रसिद्ध पू. डॉ. राजकुमार केतकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘नटराज नृत्य निकेतन’ या संस्थेने येथील राम गणेश गडकरी रंगायतन येथे ‘तथास्तु’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. कथ्थक नृत्याचार्य पू. डॉ. राजकुमार केतकर गुरुजींना गंडाबंध शिष्या कथ्थक नृत्य अलंकार प्रीती घाणेकर यांनी १११ विद्यार्थिनींच्या साहाय्याने नृत्यातून मानवंदना दिली. गुरूंनी शिष्याला पवित्र धागा बांधणे, याला गंडाबंधन, असे म्हणतात.
याप्रसंगी पू. डॉ. राजकुमार केतकर, नटेश्वर डान्स अकॅडमीचे प्रमुख वैभव जोशी, लोकनृत्य अभ्यासक सदानंद राणे, ‘नृत्यदर्पण फाऊंडेशन लायब्ररी’च्या संस्थापक पौलमी मुखर्जी आदी मान्यवर उपस्थित होते. ‘कथ्थक’ या शास्त्रीय नृत्य प्रकारातील २० विविध प्रकारच्या नृत्यांचे सादरीकरण कलाकारांनी या वेळी केले. मधुरम्, तीन ताल, तराना, शिवस्तवन, दुर्गास्तुती, ठुमरी या नृत्यांना प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचा समारोप प्रीती घाणेकर यांनी रचलेल्या गुरुभजनाने झाला. कार्यक्रमाचे निवेदन डॉ. प्रतीक्षा बोर्डे यांनी केले.