अल्प शुल्कामुळे शेतकरी संतप्त !
नाशिक – कांद्याला अल्प शुल्क दिल्यामुळे संतप्त झालेल्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकर्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत. चांगल्या दर्जाच्या कांद्याला १ सहस्र ५०० ते २ सहस्र रुपयांचे शुल्क दिले जात आहे, असा आरोप शेतकर्यांनी केला आहे, तसेच चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीतही कांद्याचे लिलाव बंद पाडले आहेत.
‘नाफेडकडून कांद्याची खरेदी केली जाईल’, असे सरकारकडून सांगण्यात आले; मात्र ‘नाफेड कुठे आहे ?’ असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. ‘नाफेडने बाजार समितीत येऊन कांद्याला २ सहस्र ४०० रुपयांचे शुल्क द्यावे’, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. लिलाव चालू होताच कांद्याला १ सहस्र ८०० ते २ सहस्र रुपयांचा भाव पुकारल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
नांदगाव आणि मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव चालू !
नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसह मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या लिलावाची प्रक्रिया सुरळीत चालू आहे. या दोन्ही बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी १ सहस्र ८०० ते २ सहस्र २०० रुपयांपर्यंतचे शुल्क मिळत आहे. बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक अल्प झाल्याचे चित्र दिसत आहे. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मध्यस्थीने जिल्ह्यातील काही बाजार समितीचे लिलाव पूर्ववत् चालू झाले आहेत. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात मूल्य ४० टक्के केल्याने ३ दिवसांपासून बाजार समित्या बंद होत्या.