वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीची केंद्रीय गृहमंत्र्यांकडे मागणी
वाराणसी (उत्तरप्रदेश) – गेल्या ३ मासांपासून मणीपूरमधील कुकी (ख्रिस्ती) समुदायाकडून मणीपूरला काश्मीरप्रमाणेच नियोजित हिंसाचार करून हिंदुविहिन करण्याचा मोठा कट रचला जात आहे. अलीकडेच देहलीत मोहरम्च्या मिरवणुकीत हिंदूंच्या सरकारी बसेस आणि सार्वजनिक मालमत्ता यांवर लहान मुलांच्या माध्यमातून आक्रमणे झाली. हरियाणातील नूंह (मेवात) येथील श्री महादेवाच्या मंदिरात जलाभिषेक करण्यासाठी आलेल्या सहस्रो भाविकांवर भीषण आक्रमण झाले. अशा अनेक छोट्या-मोठ्या घटनांमधून मोठ्या गृहयुद्धाची सिद्धता तर होत नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे. या दंगलीत मारल्या गेलेल्या प्रत्येक हिंदूला १० लाख रुपये आणि मालमत्तेच्या हानीची संपूर्ण भरपाई द्यावी, दंगलखोरांची मालमत्ता जप्त करण्यात यावी आणि ज्या दंगलखोरांची घरे, दुकाने आदी अनधिकृत आहेत, त्यांच्यावर बुलडोझर चालवावा, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समितीने अपर जिल्हा दंडाधिकारी आलोक कुमार वर्मा यांच्या माध्यमातून मा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ‘राष्ट्रीय मानवाधिकार आणि न्याय परिषदे’चे महासचिव अधिवक्ता अरुण मौर्य, ‘इंडिया विथ विझडम’चे संस्थापक अध्यक्ष अधिवक्ता कमलेश चंद्र त्रिपाठी, अधिवक्ता सूरज यादव, अधिवक्ता शुभम यादव, अधिवक्ता प्रवीण श्रीवास्तव, ‘बजरंग दला’चे श्री. संजय गुप्ता, ‘पंचचक्र हनुमान चालीसा ग्रुप, वाराणसी’चे अध्यक्ष श्री. राजकुमार पटेल, सर्वश्री गोपाल पांडेय, चन्द्रमौली पांडेय, प्रमोद गुप्ता आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन केशरी उपस्थित होते.